WPL चे दोन सामने होणार प्रेक्षकांशिवाय

 WPL चे दोन सामने होणार प्रेक्षकांशिवाय

नवी मुंबई, दि. १३ : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी तसेच १६ जानेवारी रोजी निकालाच्या दिवशी नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या वूमन्स प्रीमियर लीग (WPL) क्रिकेट सामन्यांना प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा निवडणूक कामात गुंतलेली असल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शकपणे व निर्भय वातावरणात पार पडावी, हा प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे स्टेडियम परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्याच्या दृष्टीने प्रेक्षकांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.

या निर्णयामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये काहीशी नाराजी असली तरी, लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व लक्षात घेता बहुतांश नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा प्रेक्षकांसाठी स्टेडियम खुले केले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मतदान व मतमोजणीच्या दिवशी शहरभर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट सामन्यांसाठी अतिरिक्त पोलीस बळ उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी स्पष्ट केले. हजारो प्रेक्षकांची गर्दी, संभाव्य वाहतूक कोंडी व कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे सामने ‘क्लोज्ड डोअर’ पद्धतीने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या क्रिकेट सामन्यांचा निवडणूक प्रक्रियेवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोजकांना आधीच सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनीही मतदान व निकालाच्या दिवशी सामन्यांसाठी पोलीस बंदोबस्त देणे शक्य नसल्याचे स्पष्ट कळविले होते.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *