जागतिक पाणथळ दिन : आपल्या सामाईक भविष्यासाठी पाणथळ जमिनीचे संरक्षण
राधिका अघोर
दरवर्षी 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिन साजरा केला जातो. पाणथळ म्हणजेच इंग्रजीत ज्याला wetland असे म्हणतात, त्याबद्दल तशी लोकांना फारच कमी माहिती असते. पर्यावरण आणि निसर्ग साखळीत जंगलांचं जितकं महत्त्व आहे, तितकेच महत्त्व पाणथळ प्रदेशांचे आहे. खरे तर, पाणथळ जागा, पृथ्वीवरील एकूण भूभागापैकी केवळ तीन टक्के जागेवर आहेत. मात्र, जंगले जितका कार्बन शोषून घेतात, त्याच्या तिप्पट कार्बन, हे पाणथळ प्रदेश शोषून घेतात. त्यामुळे आज जगाला भेडसावणाऱ्या, हवामान बदल, तापमान वाढ अशा समस्यांवर उपाय शोधतांना, पाणथळ प्रदेश अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. मात्र, त्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. आणि जागतिक पाणथळ दिन त्याच जनजागृतीसाठी साजरा केला जातो.
इराणमधल्या रामसर इथे,1971 साली, पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या करारावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांपैकी भारत हा एक आहे. 2 फेब्रुवारी 1971 रोजी पाणथळ क्षेत्राबाबत हा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारल्याचे स्मरण म्हणून, जागतिक पाणथळ दिन जगभरात साजरा केला जातो.
त्याआधी, पाणथळ प्रदेश म्हणजे काय, हे समजून घ्यायला हवे. नदी, तलाव, सागरी किनारे अशा ठिकाणी उथळ पाण्याने झाकलेल्या आणि अनेकविध प्रकारच्या गवतांनी तसेच झुडपांनी भरलेल्या पाणथळ जमिनी म्हणजे पाणथळ प्रदेश. यात, कृत्रिम तलाव , कालवे, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव, मत्सशेती तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो.
आता पाणथळाचा नेमका उपयोग कसा होतो, ते जाणून घ्यायला हवे. भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण करण्याचे काम असे प्रदेश करतातच, पण ते करतांना, इथल्या वनस्पती, पाण्यातील, जमिनीवरील प्रदूषणकारी घटक बाजूला फेकत हे पाणी शुद्ध करतात. सागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेश आणि कांदळवनांमुळे लाटांनी होणारी किना-यांची धूप थांबवली जाऊन वादळांपासून होणारे नुकसानही कमी होते. शिवाय समुद्राचे आक्रमण थोपवून किनारी जमीन अतिक्षारयुक्त होण्याची क्रियाही खारफुटीमुळे कमी होते. नदीला पूर आल्यास किंवा अतिवृष्टी झाल्यासही हे जास्तीचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशात मुरते आणि मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी होते.
महाराष्ट्राचा विचार केल्यास असे दिसते की इथले महत्त्वाचे पाणथळ प्रदेश हे दख्खनच्या पठारावरील नद्या- उपनद्या, धरणांमागील जलाशय आणि पाझर तलावांच्या आसपासच्या परिसंस्था आहेत. यामुळे भूजलाचे पुनर्भरण आणि पाझर यात मोलाची मदत होते.
त्याशिवाय, बगळे, बदके, करकोचे, खंड्या तसेच शिकारी प्रजातींच्या आणि इतरही अनेक पक्ष्यांचा, पाणथळ प्रदेश हक्काचा अधिवास आहे. ‘प्लवर’ सारख्या विशिष्ट प्रजातींची घरटी पाणथळ प्रदेशांत आढळतात. हे पक्षी या प्रदेशातील अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा दुवा असत्तात.
पाणथळ प्रदेशांचे महत्त्व जाणून घेत, त्यांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी संस्था तसेच वैयक्तिक स्तरावरही काम व्हायला हवे. मोठ्या, आणि जागतिक निकषांची पूर्तता करणाऱ्या पाणथळ प्रदेशांना, रामसर हा दर्जा दिला जातो. भारतात आज अशा 80 रामसर स्थळे आहेत. दोनच दिवसांपूर्वी भारतातील आणखी पाच जागांना पाणथळ दर्जा मिळाला आहे. यापैकी तीन स्थळे, अंकसमुद्रा पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र , अघनाशिनी नदी आणि मागाडी केरे संवर्धन राखीव क्षेत्र कर्नाटकात आहेत तर उर्वरित दोन, कराइवेट्टी पक्षी अभयारण्य आणि लाँगवुड शोला राखीव वन क्षेत्र तामिळनाडूमध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पाणथळ क्षेत्रांच्या यादीत या पाच पाणथळ स्थळांचा समावेश केल्यानेमुळे, रामसर स्थळांच्या अंतर्गत समाविष्ट एकूण क्षेत्र आता 1.33 दशलक्ष हेक्टर इतके झाले आहे.
जागतिक पाणथळ दिन 2025 ची संकल्पना आपल्या सामाईक संरक्षणासाठी पाणथळ जागांचे संरक्षण अशी आहे. गेल्या काही वर्षात, जगभरात अनेक ठिकाणी पूर, भूकंपानंतर त्सुनामी अशा घटना घडल्या, ज्यात होणारा विध्वंस फार मोठा होता. मात्र जिथे पाणथळ जमिनी असतात, अशा ठिकाणी पूर किंवा त्सुनामी चे धोके टाळता येतात, किमान हे धोके टाळण्यासाठी म्हणजे आपलाच जीव वाचवण्यासाठी तरी पाणथळ संरक्षण करायला हवे.