17 वर्षांखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप भारताला कांस्यपदक

अम्मान, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जॉर्डनच्या अम्मान येथे सुरू असलेल्या 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने पहिले पदक जिंकले. युवा कुस्तीपटू रौनक दहियाने ग्रीको-रोमन 110 किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. साईनाथ पारधी हा भारतातील आणखी एक ग्रीको-रोमन कुस्तीपटू आहे, जो कांस्यपदकाच्या शर्यतीत आहे. 51 किलो वजनी गटात रिपेचेज फेरीत त्याचा मुकाबला अमेरिकेच्या मुन्नारेटो डोमिनिक मायकलशी होईल. जर त्याने मुनारेटोला पराभूत केले तर कांस्यपदकासाठी त्याला आर्मेनियाचा सार्गिस हारुत्युन्यान आणि जॉर्जियाचा युरी चॅपिडझे यांच्यातील विजेत्याशी सामना करावा लागेल. साईनाथ पारधी याने सुरवातीच्या काळात मीरा भाईंदर मधील श्री गणेश आखाड्यात कुस्तीचे धडे गिरविले आहेत.
साईनाथ हा गोऱ्हे जिल्हा पालघर इथला मूळ रहिवासी असून त्याची कुस्तीची आवड आणि गुण लक्षात घेऊन त्याला मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी सदानंद पाटील यांनी भाईंदरच्या श्री गणेश आखाड्यात दाखल केले होते. साईनाथ चे वडील ही कुस्तीपटू होते मात्र एका अपघातात त्यांना अपंगत्व आले त्यामुळे त्यांची अधुरी इच्छा आता साईनाथ पूर्ण करीत आहे
कांस्यपदकाच्या लढतीत रौनकने तुर्कियेच्या इमरुल्ला कॅपकनचा 6-1 असा पराभव केला. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत रौनकला हंगेरीच्या झोल्टन जाकोकडून 0-2 ने पराभव पत्करावा लागला होता.
या प्रकारातील सुवर्णपदक युक्रेनच्या इव्हान यांकोव्स्कीने पटकावले आहे. त्याने अंतिम सामन्यात झोल्टन जॅकोचा 13-4 असा पराभव केला.
दिल्लीच्या प्रसिद्ध छत्रसाल स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या रौनक दहियाने आपल्या चॅम्पियनशिप मोहिमेची सुरुवात आर्टूर मानवेलयानवर 8-1 असा विजय मिळवून केली. यानंतर रौनकने डॅनियल मास्लाकोवर तांत्रिक श्रेष्ठतेने विजय मिळवला. मात्र उपांत्य फेरीचा सामना गमावल्यामुळे तो सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला.
SL/ML/SL
22 August 2024