जागतिक पर्यटन दिन : परस्पर संस्कृतींचा सन्मान करत, सौहार्द निर्माण करून पर्यटन वाढवा

 जागतिक पर्यटन दिन : परस्पर संस्कृतींचा सन्मान करत, सौहार्द निर्माण करून पर्यटन वाढवा

मुंबई, दि. 22 (राधिका अघोर) :जगभरात 27 सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” म्हणून साजरा केला जातो. 1970 साली याच दिवशी संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना झाली होती, त्याचे औचित्य साधून 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) साजरा करण्यास सुरुवात झाली.
आंतरराष्ट्रीय समुदायाला पर्यटनाचे महत्त्व सांगण्यासाठी तसेच, पर्यटनाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक मूल्य लोकांसमोर आणत, पर्यटनाला चालना देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सहाजिकच, या दिवशी पर्यटन विषयक कार्यक्रम, उपक्रम राबवले जातात.

संयुक्त राष्ट्रसंघानुसार, पर्यटन जगातील महत्वाच्या आर्थिक क्षेत्रांपैकी एक आहे.
पर्यटनामुळे त्याच्याशी संलग्न इतर अनेक क्षेत्रात रोजगार निर्मिती होते. जगात असे अनेक देश आहेत, ज्यांचे अर्थकारण केवळ पर्यटनावर अवलंबून आहे. यंदाच्या म्हणजे 2024 च्या जागतिक पर्यटन दिनाची संकल्पना आहे – ‘पर्यटन आणि शांतता.’
यंदा, सगळे जग युद्ध आणि संघर्षाच्या सावटाखाली आहे. अशा वेळी, प्रत्येक क्षेत्रात, शांतता प्रस्थापित करण्याला महत्त्व दिलं जातं.

जगाला एकमेकांशी जोडण्यात पर्यटन क्षेत्राची भूमिका महत्वाची आहे. विविध संस्कृतींच्या लोकांना एकत्र आणण्यात आणि सुसंवाद स्थापन करण्यासाथी पर्यटन हे उत्तम माध्यम आहे. जेव्हा आपण कुठल्या देशात जातो, तेव्हा आपण केवळ प्रवास करत नाही, आपण त्या देशाच्या संस्कृतीशी समरस होतो आणि त्यांना आपलसं करतो. हा अनुभव आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवणारा ठरू शकतो, एखाद्या स्थळाबद्दल, व्यक्तीबद्दल आपले काही पूर्वग्रह असतील, तर ते दूर करू शकतो. एका अर्थाने, पर्यटन विविध देश आणि संस्कृतींमध्ये समंजस सेतू बांधते, आणि शांतता प्रस्थापित करण्याला आणखी काय हवे असते?

युरोप आणि पश्चिम आशिया हे दोन खंड त्यांच्या निसर्ग आणि समृद्ध मानवी पर्यटन स्थळांसाठी ओळखले जातात, मात्र गेल्या तीन दशकात पश्चिम आशियातल्या अनेक देशांमध्ये मानवी संघर्ष, यादवी युद्ध आणि आता होत असलेला इस्रायल- लेबेनॉन संघर्ष यामुळे ह्या देशातल्या पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. या संपूर्ण प्रदेशात शांतता प्रस्थापित झाली, तर इथल्या पर्यटनाला चालना मिळेल, इथल्या लयाला जात असलेल्या प्राचीन संस्कृतीची ओळख जगाला होईल, आणि ते वैभव पुनरुज्जीवित करता येईल. तीच गोष्ट युरोपची, स्थलांतरितांच्या लोंढयामुळे, युरोपची प्राचीन संस्कृती नष्ट होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

आज जेव्हा आपण शांतता ही संकल्पना म्हणून मांडतो आहोत, त्यावेळी आपल्याला समाजात दीर्घकालीन सौहार्द प्रस्थापित करण्यात, शाश्वत पर्यटनाची भूमिका महत्वाची ठरली पाहिजे. शाश्वत पर्यटन, सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करते, पर्यावरणाचे संरक्षण करते. एखाद्या पर्यटन स्थळी असलेल्या स्थानिक समुदायांच्या पद्धती, परंपरांचे संरक्षण करते. मात्र यासाठी पर्यटकांनी तशी जबाबदार भूमिका पार पाडायला हवी.
सध्या तंत्रज्ञानाचीही पर्यटनाला आकार देण्यात महत्वाची भूमिका आहे. व्हीआर, भाषांतर अॅप यांची भूमिका पर्यटन वाढवण्यात महत्वाची ठरते, लोकांना जोडण्यात महत्वाची ठरते. अशा प्रकारची आणखी संशोधनं व्हायला हवी, ज्यातून शांतता निर्माण करण्याची पर्यटनाची क्षमता अधिक वाढेल.

भारतातही जागतिक पर्यटन दिन साजरा केला जात आहे. यंदा आपण ग्रामीण आणि कृषी पर्यटनावर भर देत आहोत. पुढच्या पिढीला, देशातली जुनी आणि आजची पर्यटन व्यवस्था समजावी, त्यांना ग्रामीण भारताशी स्वतःला जोडून घेता यावं, या दृष्टीनं पर्यटनाला प्रोत्साहन दिले जात आहे. कृषी आणि ग्रामीण संस्कृतीची ओळख, आदर यातून शिकवला जाणार आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत पर्यटन दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.

आज जेव्हा आपण जागतिक पर्यटन दिन साजरा करतो आहोत, अशा वेळी, केवळ पर्यटक म्हणून नव्हे, तर जागतिक नागरिक आणि शांततादूत म्हणून आपली भूमिका पार पाडण्याचा आपण निश्चय करुया. आपण आपल्या देशात पर्यटनासाठी जात असू किंवा एखाद्या नवीन देशाची ओळख करून घेणार असू, हे करतांना परस्पर संस्कृतीची ओळख आणि सौहार्द वाढीस लागेल, त्यातून नवनवीन लोकांशी मैत्री आणि आदर निर्माण होईल, याची काळजी घेऊया.

ML/ML/PGB 27 SEP 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *