जागतिक व्याघ्र संरक्षण दिन : अधिवास वाढवणे आणि मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज
मुंबई, दि. २९ (राधिका अघोर) : जंगलाचा समतोल राखणारा आणि म्हणूनच अन्नसाखळी परिसंस्थेत सर्वात वरच्या स्थानी असणारा वाघ, जपला तरच जंगलं राहतील आणि जंगलं राहिलीत तर आपण राहू, हे शहाणपण माणसाला आल्यानंतर जगभरातील व्याघ्र संरक्षण आणि संवर्धनाचे प्रयत्न सुरू झाले.. गेली जवळपास 15 – 20 वर्षे यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यानंतर आता याची चांगली फळे म्हणजे वाघांची वाढलेली संख्या आपल्याला दिसू लागली आहे. पण त्याचा आता आणखी एक जाणवलेला धोका म्हणजे अधिवासांची कमतरता! आणि त्यामुळे होणारे मानव वन्यजीव संघर्ष! आज व्याघ्र संवर्धनात हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न ठरला असून ,त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
वाघ पृथ्वीच्या, वनांच्या अस्तित्वासाठी आणि पर्यायाने आपल्याही अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक आहे. जंगलात वाघ आहे तेव्हाच ते जंगल परिपूर्ण आहे. त्यात शाकाहारी प्राण्यांच्या संख्येचा समतोल आहे, जंगल राखले आहे, म्हणून पृथ्वीवर गोडे पाणी आहे. आणि जल हैं तो जीवन हैं. इतकं साधं सरळ हे निसर्गचक्र आहे. यात प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे. मात्र, माणसाने त्याच्या भूमिकेच्या पलीकडे जाण्याचा अट्टाहास केला आणि तिथून पृथ्वीच्या रंगमंचाचा समतोलच बिघडला. माणसाने कधी स्वतःची गरज भागवण्यासाठी बेसुमार जंगलतोड केली, तर कधी मोह आणि शौर्याच्या खोट्या कल्पनांपायी वाघांची शिकार केली, तस्करी केली, कुठे मानव – वन्य जीव संघर्षात वाघाचा बळी गेला.
परिसंस्थेमधील वाघ कमी होऊ लागले तशी निसर्गाची चक्रे उलटी पडू लागली. पर्यावरणाला धोका निर्माण होऊ लागला. मग सुजाण माणसांना जाग आली आणि व्याघ्र संरक्षण संवर्धनाचे प्रयत्न सुरु झाले. जागतिक पातळीवर असे प्रयत्न करण्याचा आवाज घुमू लागला. त्यातूनच 29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून पाळण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
एकेकाळी संपूर्ण आशियात आढळणारा वाघ हा प्राणी आज जगातील फक्त 13 देशांमधे आहे. त्यातील बहुतांश देश आशिया खंडातील आहेत. आणि भारत त्यातला सर्वात महत्वाचा देश आहे. जगातील एकूण वाघांपैकी 70 टक्क्यांपेक्षा अधिक वाघ भारतात आहे. म्हणूनच भारताला tiger capital असेही म्हणतात. एकेकाळी विपुल वाघ असलेल्या आपल्या देशात साधारण 25 – 30 वर्षांपूर्वी वाघांची संख्या प्रचंड प्रमाणात घटू लागली. राजस्थानच्या सरिस्का व्याघ्र प्रकल्पात, जिथे आधी 28 वाघ होते, तिथे 2003-04 या काळात वाघांची संख्या शून्य झाली. सारिस्का आणि संसारचंदच्या वाघाच्या शिकारी या प्रकरणांमुळे सरकार आणि यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आणि तेव्हापासून भारतात पुन्हा एकदा व्याघ्र संवर्धन गांभीर्याने सुरू झाले. व्याघ्र संवर्धनात भारताने गेल्या 20-25 वर्षात केलेल्या प्रयत्नांमुळे भारतात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
त्याचवेळी, काही नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. वनक्षेत्र कमी आणि वाघांची संख्या वाढल्यामुळे मानव – वन्यजीव संघर्ष वाढतो आहे, तर दुसरीकडे, वाघांची शिकार आणि इतर कारणांमुळे वाघांच्या मृत्यूचे प्रमाण ही वाढले आहे. आज या प्रश्नांवर आपल्याला गांभीर्याने विचार आणि काम करण्याची गरज आहे. व्याघ्र दिनानिमित्त जनजागृती, आणि केवळ वाघच नाही, तर मार्जार कुलातील सगळ्याच वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन अधिक नेटके, अधिक सूत्रबद्ध होण्यासाठी पावले उचलायला हवी आहेत…