जागतिक चिमणी दिन: चिऊताईसाठी सहृदयतेची दारं उघडून तिचे संवर्धन करा

राधिका अघोर
आपल्या सगळ्यांचं बालपण चिऊताई चिऊताई दार उघड… ह्या बालगीतापासून सुरू होतं. चिमणी भारतातल्या लोकांसाठी तरी केवळ एक पक्षी नाही, तर घराचा, अंगणाचा, आयुष्याचाचा एक अविभाज्य घटक आहे. सगळ्यात पहिल्यांदा बाळाची ओळख ह्या चिमुकल्या गोड पक्ष्याशी होते आणि मग ती पुढे कायम राहते. आपल्या घराच्या खिडकीत, अंगणात, ओसरीत, गॅलरीत कुठेही सहज दिसणारा हा पक्षी, कदाचित अतिपरिचयात अवज्ञा झाल्याप्रमाणे आपल्याला कधी वेगळा, विशेष वाटलाच नाही.
आपली रोजची सकाळ आपल्या चिवचिवाटाने प्रसन्न करणाऱ्या चिमणीचे आपल्या निसर्गात पर्यावरणात असलेले योगदान आणि त्यांच्या प्रजातीला निर्माण झालेला धोका, याची जाणीव आपल्याला व्हावी, यासाठी 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो.
आताच्या प्रौढ पिढीला, गावात किंवा शहरातही सकाळी चिमण्यांचा थवा पाहिल्याचे आठवत असेल. मात्र अगदी सहज, केव्हा ही दिसणारा हा पक्षीय देखील आता आपल्या आयुष्यातून जवळपास नाहीसा झाला आहे. एकेकाळी मोठ्या संख्येनं असलेल्या चिमण्यांची संख्या आता इतकी कमी झाली आहे, की कदाचित पुढच्या पिढीला हा पक्षी चित्रातच बघावा लागेल. म्हणूनच, हा दिवस साजरा करुन चिमण्यांबद्दल जागृती करणे आवश्यक आहे.
याच विचाराने, नेचर फॉरेव्हर ह्या पर्यावरण विशेषतः पक्षी संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थेने 2010 पासून 20 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून घोषित केला. आतापर्यंत ह्या मोहिमेत 50 हून अधिक देश सहभागी झाले आहेत.
शहरातून चिमण्या हद्दपार होत आहेत, हे रोखण्यासाठी आणि चिमण्यांचे महत्त्व जगाला समजावे म्हणून 2012 साली दिल्लीचा राज्य पक्षी म्हणून चिमणीला स्थान देण्यात आले.
आपल्याला वाटेल, हा रोज दिसणारा सामान्य पक्षी असला काय किंवा नामशेष झाला काय? काय फरक पडतो? माणसाला कायम असंच वाटतं की जग आणि हे निसर्गचक्र ही आपणच चालवतो. या परिसंस्थेत इतरांची भूमिका ही आपणच ठरवतो. पण निसर्गाच्या ह्या परिसंस्थेत खरं तर, माणूस सोडून प्रत्येकाला महत्त्व आहे.
चिमणी किटक खाऊन जगणारा प्राणी आहे. त्यामुळे कीटकांची संख्या मर्यादित ठेवण्यात तिचा मोठा हातभार असतो. तिचा बहुतांश काळ खाली जमिनीवर, किंवा छोट्या झाडांवर जातो. त्यामुळे झाडावरचे परागकण आणि फळांच्या बिया इकडेतिकडे घेऊन जाण्यात चिमण्यांची भूमिका महत्वाची असते. एका अर्थाने, चिमणी निसर्गाची एक वाहक, एक दूतच असते. ह्या परिसंस्थेतील जैवविविधतेचे संरक्षण ती करत असते. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातही, त्यांचं अस्तित्व अत्यंत आवश्यक आहे.
मात्र आज विविध कारणांनी हे अस्तित्व धोक्यात आलं आहे. अगदी चिंताजनक वाटावं अशा वेगाने चिमण्यांची संख्या घटते आहे. शहरात, वाहनाच्या इंधनातून निघणारा विषारी धूर पोटात जाऊन चिमण्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. कीटकांवर ही त्याचा परिणाम होतो, आणि ते कीटक चिमण्या खातात. मोबाईल चे टॉवर्स, तारा, शहरीकरणामुळे होत असलेल्या बांधकामात, त्यांचे अधिवास, झाडं नष्ट केले जाणे, आधुनिक इमारतींमध्ये चिमण्यांसाठी घरटी घालायला जागाच नसणे, ही शहरातली कारणे झाली. तर ग्रामीण भागात शेतीसाठी होत असलेला रासायनिक कीटकनाशकाचा वापर कीटकांची संख्या कमी करणारा आहे. त्याचाही परिणाम ह्या चिमण्यांवर होतो.
ह्या सगळ्या समस्यांमुळे चिमण्यांची संख्या रोडावली आहे. आपल्या परिसंस्थेसाठी त्यांचा सांभाळ खूप आवश्यक आहे. काही पर्यावरण प्रेमी त्यासाठी प्रयत्न ही करत आहेत… याच प्रयत्नातून ‘ सेव्ह द स्परो “Save the Sparrow” ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. जगत किनखाबवाला यांनी सुरू केलेल्या ह्या मोहिमेतून चिमण्यांच्या संवर्धनात मोठी वाढ झाली आहे.
त्याशिवाय चेन्नईतल्या खुद्दूहल विश्वस्त संस्थेने शाळकरी मुलाना ह्या मोहिमेत सहभागी करून घेत चिमण्यांच्या संवर्धनासाठी मोठं काम सुरू केलं आहे. ही मुलं स्वतः चिमण्यांसाठी सुंदर लाकडी घरं बांधतात, ज्यात त्यांना राहता येईल, खाद्य मिळेल आणि त्यांची संख्या वाढेल. पर्यावरण प्रेमी लोकांना ही घरं विकली जातात, त्यांच्या गॅलरीत किंवा अंगणात ती टांगली जातात आणि चिमण्या तिथे येतात. यातून लहान मुलांमध्ये चिमण्यांबद्दल प्रेम, काळजी निर्माण होते.
असे सगळे प्रयत्न सुरू असले, तरी त्यांचे प्रमाण आणि व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. आपण आपल्या अंगणात चिमण्यांसाठी चार दाणे टाकले, त्यांना घरटं बांधू दिलं, संरक्षण दिलं, तरीही चिमण्यांची संख्या वाढू शकेल.
आपलं बालपण ” चिऊताई, चिऊताई दार उघड ” ने समृद्ध झालं आहे. मात्र आपल्या पुढच्या पिढीलाही निसर्गाचा हा आनंद मिळावा, समाधान मिळवणं यासाठी आज चिऊताई आपल्याला म्हणते आहे, ” माणसा माणसा दार उघड”, निसर्गाची ही हाक ऐकून, आपल्या चिऊताई चे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे.