जागतिक टपाल दिन : लोकांमधील संपर्क आणि जगभरातील लोकांना सक्षम करणाऱ्या सेवेची 150 वर्षे पूर्ण
राधिका अघोर
आज जागतिक टपाल दिन आहे. यंदा हा दिन विशेष आहे, कारण टपाल सेवा आपली 150 वर्षे पूर्ण करत आहे. 150 वर्षे, हाच काळ या सेवेविषयी अनेक गोष्टी सांगणारा आहे. टपाल सेवा आता अनेक ठिकाणी कालबाह्य झाली आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व कदाचित आजच्या पिढीला कळणार नाही. मात्र ज्यावेळी संपर्काची इतर कुठलीही साधनं नव्हती, त्या काळात टपाल सेवेनं सगळ्या जगाला जोडून ठेवण्याचं, संपर्क साधण्याचं मोठं काम केलं आहे. औद्योगिक क्रांती आणि नंतर साम्राज्यवादी वसाहतींचा काळ, महायुद्धे या संपूर्ण काळात, झालेले पत्रव्यवहार, सर्वसामान्य लोकांना परस्परांशी जोडून ठेवणारे तर होतेच; पण युद्ध, राजनैतिक घडामोडी या सगळ्याविषयीचे पत्रव्यवहार त्या काळातला एक मोठा ऐतिहासिक दस्तऐवज ठरला आहे, इतकं त्या पत्रव्यवहाराचं आणि अर्थातच टपालसेवेचे महत्त्व आहे.
दळणवळणाची फारशी साधनं उपलब्ध नसतांना, पायी किंवा सायकलने घरोघरी जाऊन टपाल देणारा पोस्टमन कदाचित आजच्या पिढीने पाहिला नसेल, पण मागच्या सगळ्या पिढ्यांना त्याचे महत्त्व आहे. केवळ पत्रच नाही, तर शहरातून गावी किंवा शहरात शिकत असलेल्या मुलांना मनिऑर्डरने पैसे पाठवून टपाल खात्याने एक प्रकारे त्यांच्या जगण्याचीच व्यवस्था केली होती.
टपाल विभागांची एक जागतिक संघटना आहे. जागतिक टपाल संघटना, जिची स्थापना 1874 साली स्वित्झर्लंड इथं झाले होती. या संघटनेच्या स्थापनेनंतरच, आंतरराष्ट्रीय टपाल सेवा सुरू झाली आणि सगळे जग एकमेकांशी जोडले जाण्याची दारे उघडली गेली. या संघटनेच्या, 1969 साली टोकयो इथे झालेल्या संमेलनात, या संघटनेच्या स्थापनेचा दिवस म्हणून, 9 ऑक्टोबर हा टपाल दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
माणूस म्हणून आपला विस्तार आणि उत्क्रांती होण्यात टपालसेवेची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली. टपाल खात्याचं त्या काळात इतकं आकर्षण असे, की जवळपास प्रत्येक लहान मुलाला, वेगवेगळी टपाल तिकिटे जमा करण्याचा छंद होता. पोस्टमनच्या येण्याची वाट घरोघरी बघितली जात असे. साक्षरतेचं प्रमाण फार नसलेल्या आपल्या देशात तर, पोस्टमन अनेक ठिकाणी पत्रे वाचण्याचे आणि लिहून देण्याचेही काम करत असत. नंतर टेलिग्राम म्हणजेच तारेचा शोध लागला. तयार करून तातडीची, महत्वाची बातमी लगेच पोहोचवली जात असे. एखादी वाईट बातमी असो किंवा मग अभिनंदनाचे मजकूर, तार सारख्याच स्थितप्रज्ञतेने हे काम करत असे.
मात्र, ह्या सगळ्या वर्णनाचा अर्थ, टपाल खात्याची केवळ भूतकाळातील महती सांगणे हा नाही. 150 वर्षे जुन्या, ह्या सेवेने आपल्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावली, हे तर खरेच आहे, मात्र त्याहीपेक्षा, आजही ही सेवा सुरू आहे, आणि बदलत्या काळानुरूप तिने कात टाकून नवं रंगरूप धारण केलं आहे, हे वर्तमान अधिक महत्वाचे. आज सगळीकडे टपाल सेवा अत्याधुनिक, जलद झाली आहे. वैयक्तिक संपर्काची इतर जलद साधने आल्यानंतर, पत्रव्यवहार कमी झाले आहे.
मात्र अद्याप, व्यवसायिक पत्रव्यवहार, सरकारी कामकाज यासाठी टपाल सेवेचाच वापर केला जातो. टपाल सेवेनेही आधुनिक होत, मोबाईलवर टपाल ट्रॅक करणे, मेसेज पाठवणे, अशा सेवा जोडून घेतल्या आहेत. आजही संपर्क किंवा पार्सल पाठवण्यासाठीचे विश्वासार्ह साधन म्हणून टपाल खात्याकडेच पहिले जाते. त्याशिवाय टपाल खात्याने, बचत पत्रे आणि इतर काही वित्तीय सेवा सुरू करत, आपल्या कक्षाही रुंदावल्या होत्या. भारतात, प्रत्येक गावाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली सेवा म्हणून ह्या व्यवस्थेचा पाया तर मजबूत होताच; शिवाय मनुष्यबळही होते. याच भांडवलावर, पेमेंट बँक सुरू करण्याची जबाबदारी टपाल खात्याला देण्यात आली. आज या पोस्टाच्या पेमेंट बँक लोकांच्या घरोघरी जाऊन, आर्थिक सेवा देत आहेत. विद्यमान केंद्र सरकारच्या, जनधन- आधार-मोबाईल या जॅम त्रिसूत्रीच्या यशातही, टपाल खात्याचे मोठे योगदान आहे.
टपाल कार्यालयेही आता आधुनिक झाली आहेत.
आजही संपर्काचे सशक्त आणि विश्वासार्ह माध्यम म्हणून टपाल खात्याची ओळख कायम आहे, आणि या ऐतिहासिक वारशासह, ती पुढेही कायम राहो, ह्याच शुभेच्छा !!