जागतिक वसुंधरा दिन : भारतीय संस्कृतीत वसुंधरेचे महत्त्व

राधिका अघोर
आज जागतिक वसुंधरा दिन आहे. 1970 पासून दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. सुरुवातीला काही पर्यावरण स्नेही संघटनांनी हा दिवस साजरा करण्यास, त्यानिमित्त पृथ्वी संरक्षणासाठी जनजागृती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आज अनेक देशांत जागतिक पृथ्वी दिन साजरा केला जातो. भारतात पृथ्वीला माता म्हणतात,
समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडिले ।
विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्शं क्षमश्वमे ॥
असा श्लोक म्हणून सकाळी पृथ्वीला वंदन करण्याची आपली संस्कृती आहे. पृथ्वी सर्जकतेचे सर्वात मोठे आणि शाश्वत प्रतीक आहे. खरं तर, पृथ्वी आहे तर आपलं आयुष्य आहे. या एका वाक्यात, पृथ्वीचे रक्षण का करावं याचं समर्थन करता येतं. आपल्या अस्तित्वासाठी, आपली पृथ्वी जगण्यासाठी सुंदर आणि सर्व दृष्टीनी स्वच्छ राखणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे, याची जाणीव तर आपल्याला आहे. मात्र, त्यासाठी करायच्या गोष्टी, काळजी याचा आपल्याला एकतर विसर पडतो, किंवा कंटाळा येतो.
माताभूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः। म्हणजेच पृथ्वी आपली माता आहे, आणि आपण तिचे पुत्र हे तत्व आपल्याला माहित आहे. हे तत्व आपल्याला एक दिवस लक्षात ठेवायचे नाही, तर कायम आचरणात आणायचे आहे.
याच उद्देशाने, आज पर्यावरणवादी आणि निसर्गप्रेमी एकत्र येऊन निसर्ग आणि परिसंस्थांचे संरक्षण करण्याच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने उपक्रम राबवतात. या उपक्रमांमध्ये झाडे लावणे, प्लास्टिकच्या वापराविरुद्ध आवाज उठवणे, वन संवर्धनासाठी मोर्चा काढणे, कागदाचा कचरा कमी करणे इत्यादींचा समावेश आहे परंतु ते त्यापुरते मर्यादित नाही.
जागतिक पृथ्वी दिन २०२५ची मुख्य संकल्पना, ” आपली शक्ती, आपला ग्रह ” अशी आहे. यंदा, संपूर्ण जगाचे लक्ष, अक्षय ऊर्जा स्रोतांकडे वळण्यावर भर दिला जाणार आहे. वर्ष २०३० पर्यंत, जगभरात उत्पादित होणाऱ्या अक्षय ऊर्जेचे प्रमाण तिप्पट करण्याचे लक्ष्य आहे, ज्यामध्ये भूऔष्णिक, जलविद्युत, भरती-ओहोटी, पवन आणि सौर ऊर्जा यासारख्या स्वच्छ ऊर्जा स्रोतांवर विशेष भर दिला जाईल.
या दिनाचं औचित्य साधत, राज्य शासन, रिड्यूस, रियुज, रिसायकल हे अभियान सुरु केलं जाणार आह. २२ एप्रिल ते १ मे या कालावधीत, राबवल्या जाणाऱ्या ह्या उप्रक्रमाअंतर्गत, स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, पाण्याचा पुनर्वापर, हरित ऊर्जा यावर भर दिला जाणार आहे. पंचमहाभूत आणि जीवनाची आंतर-जोडणी प्राचीन भारतीय तत्वज्ञानाचा, हिंदू विचारांचा आधार पंचमहाभूतांच्या संकल्पनेवर आधारित आहे. पृथ्वी (स्थायित्व), जल (प्रवाह), अग्नी (ऊर्जा), वायू (गती) आणि आकाश (अवकाश) ही पाच मूलभूत तत्त्वे आहेत. ज्यांपासून हे संपूर्ण ब्रह्मांड आणि त्यातील सर्व सजीव-निर्जीव वस्तू बनलेल्या आहेत. मानवी शरीर देखील याच पंचमहाभूतांचे बनलेले आहे. आपले आरोग्य या तत्त्वांच्या संतुलनावर अवलंबून असते.
पर्यावरणातील हे घटक आणि मानवी शरीर यांच्यात एक अतूट संबंध आहे. या तत्त्वांचा समतोल बिघडल्यास केवळ मानवी आरोग्यच नव्हे, तर पर्यावरणाचा समतोलही ढासळतो. हिंदू तत्वज्ञानानुसार, सृष्टीतील सर्व घटक एकमेकांशी जोडलेले आहेत. एकाच वैश्विक चेतनेचे (ब्रह्मन्) अविभाज्य भाग आहेत. हा अद्वैतवादी किंवा एकात्मवादी दृष्टिकोन निसर्गाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देतो. जिथे मानव हा निसर्गाचा स्वामी नसून त्याचाच एक भाग आहे. या जाणिवेतून निसर्गाप्रती आदर आणि सहजीवनाची भावना वाढीस लागते. हेच हिंदू तत्वज्ञान सांगते आहे.
ईशावास्यम् इदं सर्वं हा ईशोपनिषदातील हा मंत्र सांगतो की, “या जगात जे काही चर-अचर आहे, ते सर्व ईश्वराने व्यापलेले आहे”. या विचारानुसार, निसर्गातील प्रत्येक कण आणि प्रत्येक जीव हा ईश्वराचाच अविष्कार आहे. त्यामुळे निसर्गाचा आदर करणे म्हणजे ईश्वराचाच आदर करणे होय. या भावनेतून निसर्गाचे शोषण करण्याची प्रवृत्ती नाहीशी होऊन संरक्षणाची भावना वाढते.
या तात्त्विक भूमिकांमुळे हिंदू संस्कृतीात निसर्गाला केवळ बाह्य घटक किंवा वापरण्याची वस्तू मानली जात नाही. निसर्ग आणि ईश्वर यांच्यात एक अभिन्न नाते आहे. निसर्गाला ‘देवाचे शरीर’ मानले जाते. त्यामुळे निसर्गाचा अनादर करणे किंवा त्याचे शोषण करणे हे केवळ पर्यावरणाची हानी नाही, तर ते एक पाप किंवा अधार्मिक कृत्य मानले जाते. हा दृष्टिकोन मानवी वर्तनासाठी एक मजबूत नैतिक चौकट मिळते, जिथे निसर्गाचे संरक्षण हे धार्मिक आणि नैतिक कर्तव्य बनते.
यावत् भूमण्डलं धत्ते सशैलवनकाननम्। तावत् तिष्ठति मेदिन्यां संततिः पुत्रपौत्रिकी॥
हा दुर्गा सप्तशती मधला श्लोक सांगतो..जोपर्यंत या पृथ्वीवर पर्वत, वने आणि जंगलं आहेत, तोपर्यंतच या पृथ्वीवर मानवाची संतती टिकून राहील. मानवी अस्तित्वासाठी वने आणि नैसर्गिक संसाधनांचे महत्त्व हा श्लोक स्पष्ट करतो. पर्यावरणाचा ऱ्हास मानवी भविष्यासाठी धोकादायक आहे, हा स्पष्ट इशारा यात दिला आहे. आपल्याला गरज आहे, ती केवळ हे इशारे समजून घेत, त्यानुसार आचरण करण्याची.
जागतिक वसुंधरा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!