महिला सक्षमीकरणाची रिक्षा पुरुष वाहनचालकांच्या हाती

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिलांच्या पंखांना बळ मिळावे, म्हणून खास महिला चालकांसाठी अबोली रिक्षाचा अनोखा उपक्रम आरटीओने सुरू केला आहे. महिलांना रिक्षाचे परवाने देताना रोजगाराचे नवे साधन दिले आहे. मात्र, उरण शहर तसेच तालुक्यातील महिला अबोली रिक्षा चालवण्याबाबत उदासीन असल्याने महिला सक्षमीकरणाची रिक्षा पुरुष वाहनचालकांच्या हाती आहे.
पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या रिक्षा व्यवसायात महिलांनीदेखील यावे, म्हणून अबोली रिक्षांनी मोठ्या उत्साहात प्रवेश केला. नवी मुंबई तसेच पनवेल शहरात १०० पेक्षा अधिक महिला अबोली रिक्षाचालक आहेत. मात्र, उरण शहर तसेच तालुक्यात फक्त सहा ते सात अबोली रिक्षा असून, यामध्ये फक्त दोनच महिला या रिक्षा चालवत आहेत; तर उर्वरित रिक्षा घरातील पुरुष सदस्य चालवत असल्याने या उद्देशाला हरताळ फासला गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या रिक्षा पुरुष चालवत असून इतर व्यवसायांप्रमाणे महिलांची उदासीनता याला मुख्य कारण ठरत आहे. Women’s empowerment in the hands of male rickshaw drivers
ML/KA/PGB
2 Nov 2023