महिलांनी कॅमेरा फोन वापरल्यास होणार कारवाई
राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील चौधरी समाजाच्या सुंधामाता पट्टीच्या पंचायतीने एक विचित्र फर्मान काढले आहे. या निर्णयानुसार, परिसरातील 15 गावांमधील सुना आणि मुलींना आता कॅमेरा असलेला स्मार्टफोन वापरता येणार नाही. त्याऐवजी त्यांना जुन्या पद्धतीचा की-पॅड असलेला साधा फोन वापरावा लागेल. एवढेच नाही तर लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम किंवा शेजारच्या घरी जातानाही सोबत मोबाईल फोन नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा नवा नियम येत्या 26 जानेवारीपासून लागू केला जाणार असल्याचे पंचायतीने स्पष्ट केले आहे.
हा निर्णय रविवारी गाजीपूर गावात आयोजित केलेल्या एका विशेष बैठकीत घेण्यात आला. या बैठकीचे अध्यक्षपद 14 पट्टीचे अध्यक्ष सुजनाराम चौधरी यांनी भूषवले होते. समाज अध्यक्ष सुजनाराम यांनी सांगितले की, पंच हिम्मताराम यांनी हा प्रस्ताव वाचून दाखवला आणि देवाराम कारनोल पक्ष यांच्याकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
या प्रस्तावावर बराच वेळ चर्चा झाली आणि त्यानंतर सर्व पंचांनी एकमताने यावर आपली संमती दर्शवली. या निर्णयाचा फटका गाजीपुरा, पावली, कालडा, मनोजियावास, राजीकावास, दातलावास, राजपुरा, कोडी, सिदरोडी, आलडी, रोपसी, खानादेवल, साविधर, भीनमाल आणि खानपूर या गावांना बसणार आहे.
पंचायतीने हा कठोर निर्णय घेण्यामागे जे कारण दिले आहे ते अधिक आश्चर्यकारक आहे. सुजनाराम चौधरी यांच्या मते, महिलांकडे मोबाईल असल्यामुळे घरातील लहान मुले त्याचा जास्त वापर करू लागतात. यामुळे मुलांच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. मुलांचे आरोग्य जपण्यासाठी आणि मोबाईलचा वापर नियंत्रित करण्यासाठी महिलांवर ही बंदी घालणे आवश्यक असल्याचे पंचायतीचे म्हणणे आहे.
दरम्यान, ज्या मुली शिक्षण घेत आहेत, त्यांना अभ्यासासाठी घराच्या आत मोबाईल वापरण्याची मुभा असेल, मात्र त्यांनाही सार्वजनिक कार्यक्रमात फोन नेता येणार नाही.