आंतरराष्ट्रीय राजनैतिक क्षेत्रातील महिला विशेष दिन

मुंबई, दि. 24 (राधिका अघोर) :राजनैतिक क्षेत्रातील महिलांना समर्पित आंतरराष्ट्रीय दिन दुसऱ्या महायुद्धानंतर सगळ्या जगभरात सौहार्द आणि परस्पर सहकार्य टिकवून ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण झाल्या आणि हळूहळू त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या देखील आल्या. आजही सर्वच जागतिक प्रश्न सोडवण्यात आणि देशांमधील राजनैतिक संबंध सुरळीत ठेवण्यात अशा संस्था महत्वाच्या भूमिका बजावतात. संस्था म्हणजे त्यातील विविध पदांवरील माणसे. सुरुवातीला या क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व होते. मात्र परराष्ट्र व्यवहार क्षेत्रात कार्यरत महिलाही हळूहळू आंतरराष्ट्रीय पदांवर diplomat म्हणजे मुत्सद्देगिरी करणाऱ्या राजनैतिक अधिकारी म्हणून नियुक्त होऊ लागल्या.
मात्र महिलांची संख्या तुलनेने आजही किरकोळ आहे. या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप पाडणाऱ्या महिलांच्या कामाचा गौरव आणि अधिकाधिक महिलांना या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, दरवर्षी 24 जून हा दिवस आंतराष्ट्रीय राजनैतिक महिला अधिकारी दिन म्हणून साजरा केला जातो. 2022 साली संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने या संदर्भातला ठराव संमत केला होता.
विसाव्या शतकातील पहिल्या महिला राजनैतिक अधिकारी म्हणून अमेरिकेच्या राजदूत डायना अबगर यांचे नाव घेतले जाते. तसे तर भारत पारतंत्र्यात असताना मादाम कामा, सरोजिनी नायडू अशा महिलांनी विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताची बाजू जोरकसपणे मांडली होती. त्यानंतर, विजयालक्ष्मी पंडित, देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज अशा नेत्यांनीही आपली छाप पाडली होती.
सध्या संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी सदस्य असलेल्या अधिकारी रुचिरा कंबोज देखील त्यांच्या खंबीर आणि स्पष्ट भूमिका घेत लोकप्रियता आणि मानसन्मान मिळवला आहे.
स्नेहा दुबे या संयुक्त राष्ट्रसंघातल्या पहिल्या भारतीय सचिव आहेत.
संयुक्त राष्ट्रांनी निश्चित केलेल्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमधे सर्व क्षेत्रात महिलांना समान संधी हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. राजनैतिक चर्चा आणि मुत्सद्देगिरी अशा जागतिक शांतता आणि सामंजस्याचा दृष्टीनं महत्वाच्या क्षेत्रात, महिलांचा सहभाग मात्र आजही नगण्य आहे. जेमतेम 20 टक्के आहे. हा टक्का वाढवण्यासाठी आणखी प्रयत्न आवश्यक आहेत.
आचार्य रजनीश ओशो यांनी आपल्या एका भाषणात असं म्हटलं आहे की जगाचा कारभार जर महिलांच्या हाती असता, तर त्यांनी जगात शांतता आणि प्रेम प्रस्थापित करतील. यातला आध्यात्मिक भाग सोडला तरी राजनैतिक विषय आणि पेच हाताळण्यासाठी जो संयम आणि चिकाटी लागते, ती महिलांमधे असते. त्यामुळे, ह्या क्षेत्रात अधिकाधिक महिलांना प्रोत्साहन दिले तर जागतिक शांततेचा मार्ग अधिक सुकर होईल, अशी अपेक्षा आहे.
ML/ML/PGB 24 Jun 2024