महिला उद्योजिका दिन : स्त्री ठरवेल, तेच तिचे स्थान असेल !

-राधिका अघोर
आपण अनेक कुटुंबातून ऐकलं असेल, विशेषतः नवऱ्यांच्या तोंडून की आमचं अर्थखाते सगळं गृहमंत्रालयाकडे असते. म्हणजे घराच्या चाव्या गृहलक्ष्मी च्या हातात असतात. यातला गमतीचा भाग सोडला तरी हिशेब आणि खर्चाचे व्यवस्थापन घरातल्या महिलाच नीट करू शकतात. एकाचवेळी वेळी अनेक गोष्टींकडे लक्ष देण्याची अष्टावधानी क्षमता त्यांच्यात असते. एखाद्या यशस्वी उद्योजकाला आवश्यक अशा सगळ्या गोष्टी त्यांच्यात उपजत, परंपरागत आहेत. फक्त त्या क्षमतांचे सोने करण्याची संधी त्यांना गेल्या काही दशकांपासून मिळाली आहे आणि स्त्रियांनी यशस्वी उद्योजिका म्हणून त्या संधीचे अक्षरशः सोने केले आहे. या यशस्वी, धडपड्या महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यासाठी 19 नोव्हेंबर हा दिवस महिला उद्योजिका दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. यंदाच्या म्हणजेच 2024 च्या दिनाची संकल्पना आहे, ” स्वप्नांना बळ देणे आणि भविष्याला प्रेरणा” ह्या संकल्पनेतूनच जगभरातल्या महिला उद्योजिकांचा दृढनिश्चय व्यक्त होतो. महिलांमध्ये ही मोठी स्वप्नं बघण्याची आणि ती पूर्ण करण्याची ताकद आहे. स्वतःचे निर्णय त्या स्वतः घेऊ शकतात, त्यातून येणाऱ्या पिढ्यांना त्या प्रेरणा देऊ शकतात. फक्त पिढ्यानपिढ्याची साचलेली मरगळ आणि दूर करून, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. केवळ भारतापुरते बोलायचे झाल्यास, भारतात आज महिला उद्योजकांची संख्या मोठी आहे.
एकेकाळी केवळ पापड लोणची, शिवणकाम यातच अडकून पडलेल्या किंवा तेवढीच मर्यादा आखून दिलेल्या महिलांनी आता आपली कल्पकता आणि धडाडी वापरून अनेक अनवट उद्योगक्षेत्रात यशस्वी पाय रोवले आहेत. मुद्रा योजनेसारख्या योजनेतून, छोटी कर्जे घेऊन, ह्या महिला आपले लघु उद्योग वाढवत आहे. विशेष म्हणजे यात ग्रामीण महिलांचे प्रमाण खूप मोठे आहे. कोविड काळात असेच मार्ग शोधून या महिलांनी आपले घर चालवले आहे. आज भारतात लखपती दीदीसारख्या योजना ही यशस्वी होत आहेत. केवळ लघु उद्योग नाही, तर मोठमोठ्या उद्योग कंपन्यांच्या सीईओ किंवा अध्यक्ष महिला आहेत. आज उद्योग क्षेत्रामध्ये जवळजवळ १४% असे उद्योग आहेत ज्यांची मालकी आणि व्यवस्थापन महिला करत आहेत आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
पेप्सिको च्या इंद्रा नुई असोत किंवा बायोकॉन च्या किरण मुजुमदार शॉ असो, ही नावं तर प्रसिद्ध आहेतच, पण याशिवाय, नायका हा स्टार्ट अप ब्रँड आज जगविख्यात करणाऱ्या फाल्गुनी नायर, इन्फिबिम कंपनीच्या निरू शर्मा, शॉपक्लूझ कंपनीच्या राधिका घई, युनिकॉर्न क्लब मध्ये जाणार्या पहिल्या भारतीय महिला उद्योजिका आहेत. झिवामी च्या रीचा कर, यात्रा च्या सबिना चोप्रा, वीणा वर्ल्ड च्या वीणा पाटील, अशी कितीतरी नावं सांगता येतील. युवर स्टोरी च्या संस्थापिका श्रद्धा शर्मा यांनी महिला उद्योजकांसाठी एक मिडीया टेक्नॉलॉजी व्यासपीठ उपलब्ध केले आहे. उद्योजकांना त्यांची स्टोरी सर्वांसमोर मांडता यावी या उद्देश्याने युवरस्टोरीची सुरुवात २००८ मध्ये झाली. आत्तापर्यंत युवरस्टोरी ने ७०,००० पेक्षा जास्त उद्योजकांच्या स्टोरीज पब्लिश केल्या आहेत. उद्योग छोटा असो किंवा मोठा, कोणत्याही वयात, केव्हाही सुरू केलेला असो, चिकाटी, परिश्रम करण्याची तयारी आणि प्रामाणिक पणा या बळावर महिला कोणत्याही उद्योगक्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. त्यांची जागा घरात, चूल आणि मूल सांभाळण्यात आहे,असे पारंपरिक समज मोडून काढत, त्यांनी हे सिद्ध केले आहे, की त्यांची जागा तिथे आहे, जिथे त्या ठरवतील. यात अडचणी, आव्हाने निश्चित आहेत, पावलोपावली भेदभाव, मानसिक खच्चीकरण याचा सामना त्यांना करावा लागतो. मात्र हा सामना करण्याची प्रेरणाही त्यांना निसर्गानेच दिली आहे. गरज आहे, ती चौकट मोडून पुढे जाण्याची ! ही चौकट मोडणाऱ्या सर्व उद्योजिकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !