संपूर्ण समाजाला पुढे नेण्यासाठी महिला सक्षमीकरण अभियान

गडचिरोली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब आणि समाज सक्षम होतो. त्यामुळे संपूर्ण समाजाला पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान सुरु केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोली येथे मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमप्रसंगी केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे यांच्यासह जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात आता उद्योग येत असून, लवकरच रेल्वे, विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. यामुळे मागास जिल्हा अशी ओळख पुसली जात असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारने १३ कोटी महिलांना उद्योगासाठी कर्ज दिल्याचे सांगून सर्व महिलांच्या हाताला काम मिळेपर्यंत मुख्यमंत्री सशक्तीकरण योजना सुरु राहील, अशी ग्वाही दिली. २०३० पर्यंत गडचिरोली जिल्हा विकसित जिल्हा म्हणून नावारुपास येईल, असा आशावादही फडणवीस यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी विविध योजनांच्या लाभार्थीना साहित्य वाटप करण्यात आले. शिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.
ML/KA/SL
9 Jan. 2024