वाराणसी विमानतळावरून सहा दिवसांच्या मुलाला पळवणाऱ्या महिलेला अटक
वाराणसी, दि. २५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :
वाराणसी विमानतळावर आज एक महिला सहा दिवसांच्या मुलासह पोहचली. त्या महिलेने सहा दिवसांच्या मुलाचे तिकीट घेतले होते. त्यानंतर एका पुरुषासोबत विमानतळावर दाखल झाली. त्यांनी तिघांचे बोर्डिंग पास घेतले. त्यावेळी त्या मुलासोबत तिच्या संशयास्पद हालचाली सुरु झाल्या होत्या. यामुळे विमानतळावरील कर्मचाऱ्यांना संशय आला. मग तिकिटांवरील नावे तपासली. त्यानंतर सहा दिवसांच्या मुलास बॉटलने दूध देत असल्याचेही कर्मचाऱ्यांनी पहिले. अखेर कर्मचाऱ्यांनी तिची चौकशी सुरु केली असता त्या बाळाचे विक्रीसाठी अपहरण होत असल्याचे उघडकीस आले.
CRPFकडून चौकशी सुरु केली असता ती महिला घाबरली. उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. मग हा सर्व प्रकार मुलांची खरेदी-विक्रीचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गोमती विभागाचे डीसीपी मनीष संडिल्य, एडीसीपी आकाश पटेल व एसीपी पिंडरा प्रतीक कुमार चौकशीसाठी दाखल झाले. त्यांनी चौकशी सुरु केली. त्यावेळी त्या महिलेने तिचे नाव निधी सिंह असल्याचे सांगितले. तिने दुल्हीपूर येथील केबी हॉस्पिटलमधून डॉक्टर अमजद खान यांना 50 हजार रुपये देऊन मुलाची खरेदी केल्याचे सांगितले.
निधी सिंह बंगळुरुमधील निसंतान दाम्पत्यास हा मुलगा विकणार होती. या मुलाचा जन्म 17 ऑगस्ट रोजी झाला होता. ज्या महिलेने त्या मुलास जन्म दिला तिला तो नको होतो. त्यामुळे डॉक्टर जमील खान याने निधी सिंह हिच्याशी संपर्क करुन 50 हजारांत त्याची विक्री केली. निधी सिंह हा मुलगा वंदना पटेल हिला विकणार होती. यापूर्वी निधी अन् डॉक्टर जमील खान यांनी मुलांची विक्री केली असल्याचे उघड झाले. या प्रकरणी निधी आणि जमील खान यांच्यावर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.
SL/ ML/ SL
25 August 2024