प्राणीसंग्रहालयातील वन्यजीव घेत आहेत कुलरचा आनंद

 प्राणीसंग्रहालयातील वन्यजीव घेत आहेत कुलरचा आनंद

नागपूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरात उन्हाचा पारा ४० च्या पार गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागपूरमध्ये राज्यात सर्वांधिक उन्हाळा जाणवतो. येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयात असलेल्या वन्य प्राण्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. गारवा मिळण्यासाठी वाघ, अस्वल, बिबट्यांसाठी ३० कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. वाघाला पाण्यात बसण्यासाठी टाके तयार केलेले आहे. प्राणी जिथे बसतात त्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी पाणी टाकून तो परिसर बंद केला जातो.

उन्हामुळे गोरेवाडा प्राणी संग्रहालय व बचाव केंद्रातील वन्यप्राण्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यांच्या आहारात बदल करण्यात आला आहे. अस्वलांच्या आहारात गाजर, बिट, काकड्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. दिवसातून तीनदा पाणीही दिले जात आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने येथे हिरव्या जाळ्यांची आच्छादने टाकली आहेत. हरणाच्या कळपांना संरक्षण देण्यासाठी सावलीची व्यवस्था केली आहे. पिंजऱ्यातील वाघ, बिबट आणि अस्वलांना दुपारी उन्हाचा त्रास होऊ नये, यादृष्टीने कुलर लावले आहेत. त्यात पाणी टाकण्यासाठी कर्मचारी तैनात आहेत.

नागपूरचा पारा ४२ ते ४४ अंशांवर गेल्याने संग्रहालय प्रशासन खबरदारी घेत आहे. प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. “वन्यप्राण्यांच्या पिंजऱ्यातील तापमान कायम राहावे यासाठी डिजिटल थर्मामीटर लावले आहेत. त्यानुसार, कुलर बंद अथवा सुरू करण्याची व्यवस्था आहे. तृणभक्षक प्राण्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून रोज काकडी, गाजर, बिट, हिरवा चाऱ्याचा आहार दिला जात आहे,” अशी माहिती एस. एस. भागवत, विभागीय वनाधिकारी, गोरेवाडा प्रकल्प यांनी दिली.

SL/ML/SL

8 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *