भीमाशंकर अभयारण्यात दोन शतकांनंतर आढळले दुर्मिळ रानकुत्रे
पुणे, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले भीमाशंकर अभयारण्य वन्यजीव आणि वनस्पतींच्या वैविध्यासाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्य परिसरात १९५ वर्षांनी आता पहिल्यांदाच ‘इंडियन वाईल्ड डॉग’ म्हणजेच रानकुत्र्यांची जोडी आढळली आहे.यासंदर्भात अलाइव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि वन्यजीव अभ्यासक उमेश वाघेला यांचा शोधनिबंध ‘झु प्रिंट’ या आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेत नुकताच प्रकाशित झाला आहे.
सुमारे दोन शतकानंतर भीमाशंकर परिसरातील आढळलेल्या रानकुत्र्यांचा हा पहिलाच फोटोग्राफिक पुरावा असून यावर शोधनिबंधही प्रसिद्ध झाला आहे.या शोधनिबंधात झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनिल महाबळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे सस्तन प्राणीशास्त्रज्ञ डॉ.श्यामकांत तळमळे यांनी रानकुत्र्यांच्या ओळखीची खात्री दिली आहे. ईस्ट इंडिया कंपनीचे कर्नल विल्यम हेन्त्री साईक्स यांनी भीमाशंकरच्या आदिवासी रहिवाशांना रानकुत्र्यांच्या अस्तित्वाची पुरेपूर माहिती होती. १८२८ साली त्यांनी मृत रानकुत्रे पाहिल्याची नोंद केली आहे.
रानकुत्रा हा कळपाने राहणारा सामाजिक मांसाहारी प्राणी आहे.हे वेगवेगळ्या प्रकारच्या घनदाट जंगलातील मोकळ्या जागेत राहणे पसंत करतात. उन्हापासून सावली, आहारासाठी योग्य शिकार प्रजाती आणि पिण्यासाठी पाणी असेल अशा अधिवासात ते राहतात. रानकुत्रे महाराष्ट्रच्या उत्तर आणि पूर्व भागात आढळून येते. वाई विभाग, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील कॅमेरा ट्रॅप सर्वेक्षणातही याची नोंद करण्यात आली आहे.
SL/ML/SL
28 Aug 2024