तब्बल वीस वर्षे मुख्यमंत्रीपद असूनही विदर्भाचा विकास का नाही?
नागपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भात तब्बल वीस वर्षे मुख्यमंत्रीपद असूनही मागासपणाबद्दल कायम पश्चिम महाराष्ट्राला का दोष देता असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला, नियम २९३ अन्वये सत्तारूढ पक्षाने उपस्थित केलेल्या विदर्भ , मराठवाडा विकास प्रश्नावरच्या चर्चेत ते बोलत होते.
विदर्भात राजकीय शक्तीचा अभाव का आहे , इथल्या जिल्हा बँका बंद का पडतात , दूध आणि साखर उत्पादन का कमी होतं, कापसाचे उत्पादन भरपूर असताना सूतगिरण्या का उभ्या राहत नाही, संत्रा प्रक्रिया उद्योग का होत नाहीत असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
मध्येच वेगळ्या विदर्भाचे स्वप्न दाखवलं जातं, मात्र एकत्रित राहिलो तर विकास चांगला होईल , महाविकास आघाडी सरकारने कायम राज्याचा समतोल विकासाचा प्रयत्न केला असं ते म्हणाले. विदर्भ , मराठवाडा विकास महामंडळाची पुनर्रचना आम्ही राज्यपालांशी असलेल्या मतभेदांमुळे केली नाही अशी कबुली पवार यांनी दिली , मात्र विकास थांबला नाही असं ते म्हणाले.
सरकारने तब्बल बावन्न हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडून आर्थिक शिस्त बिघडवली आहे, केवळ चाळीस आमदारांसाठी या मधली मोठी रक्कम वापरली जाणार आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. नगरविकास खात्यात साडे चार हजार कोटींची ठोक तरतूद कोणत्या नियमात केली असा सवाल त्यांनी केला.
ML/KA/SL
27 Dec. 2022