मोदीजी चुटकीसरशी रोजगार, महागाईची समस्या का सोडवली नाही ?

 मोदीजी चुटकीसरशी रोजगार, महागाईची समस्या का सोडवली नाही ?

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात आज सर्वात जास्त महागाई आणि बेरोजगारी आहे, केंद्र सरकारमध्ये ३० लाख सरकारी पदे रिक्त आहेत पण मोदी सरकारने ती भरली नाहीत. बेरोजगारीबरोबरच महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल, डिझेल,गॅस सिलिंडर, खाद्यतेल, सोने, चांदी सर्वांच्या महागाईची भेट मोदींनी दिली. शेती साहित्यावर जीएसटी लावला, सर्व बाजूंनी मोदी सरकारने जनतेला संकटात टाकले आहे.नरेंद्र मोदी जगातील सर्वात शक्तीमान नेते असून चुटकीसरशी सर्व समस्या सोडवतात असा भाजपाचा दावा आहे तर रोजगार ,महागाईची समस्या का सोडवली नाही ? असा हल्लाबोल काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला.

लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी उदगीरच्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. प्रियंका गांधी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्राने सामाजिक न्यायाची परंपरा जपली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही भूमी आहे. काँग्रेस सरकारने मराठवाड्यात विकासाची कामे केली आहेत.पण मागील काही वर्षांपासून चित्र बदलले आहे. मोदी सरकारच्या काळात दलितांवर शोषण , अत्याचार होत आहेत पण सरकार डोळे बंद करुन बसले आहे, जनता संकटात आहे, देशातील जनता संकटांचा सामना करत आहे परंतु टीव्हीवर मात्र सर्वकाही आलबेल आहे असे दाखवले जात आहे.

मोदी शिवाय जगात दुसरा कोणताच नेता मोठा नाही असे भासविले जाते. पण परिस्थीती तशी नाही. मोदी सरकारने तुमच्यासाठी काय केले? रोजगार दिले का? महागाई कमी केली का? तुमच्या जीवनात काय बदल घडवला का? महिलांना काही मदत केली का? असे प्रश्न विचारून प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारची पोलखोल केली. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे, नोकरी मिळावी यासाठी गरिब घरातील लोक विपरीत परिस्थीतीत मुलांचे पालन पोषण करतात. पण मोदी सरकार गरिबांना केवळ ५ किलो रेशन देते, यातून तुमच्या मुलांचे भविष्य बनणार आहे का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने गरिब श्रीमंत सर्वांना समान अधिकार दिले आहेत, हे अधिकार काढून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाला संविधान बदलायचे आहे. भाजपाचा डाव जनतेच्या लक्षात आल्यानंतर आता मोदी प्रत्येक सभेत संविधान बदलणार नाही अशी सारवा सारव करत आहे. मोदींच्या पक्षांतील खासदारांनीच संविधान बदलण्याची भाषा केली आणि भाजपात मोदींच्या परवानगी शिवाय पानही हलत नाही, त्यांच्या परवानगीनेच संविधान बदलण्याची भाषा खासदारांनी केली पण आता त्यांची भाषा बदलली आहे. नरेंद्र मोदी सातत्याने म्हणतात ७० वर्षात काहीच झाले नाही, एकवेळ मोदी म्हणतात तसे काहीच झाले नाही तर जनतेने मोदींना १० वर्ष सत्ता दिली होती या १० वर्षात तुम्ही काय केले ते तरी सांगा, असा सवाल करत नरेंद्र मोदी हे अहंकारी नेते आहेत, ते सातत्याने खोटे बोलतात परंतु मोदींची नौटंकी आता चालणार नाही, ‘अब की बार जनता की सरका’, असा नारा देत आता जागे व्हा, तुमचे मत वाया घालवू नका, हा देश तुमचा आहे, आज देश वाचवण्याचा प्रयत्न केला नाही तर भविष्य अवघड आहे. मतदान करण्याआधी तुमच्या भविष्याचा विचार करा मगच मतदान करा, असे आवाहनही प्रियंका गांधी यांनी केले.

SL/ML/ML
27 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *