जागतिक पर्यावरण दिन कुणासाठी

  जागतिक पर्यावरण दिन कुणासाठी

मुंबई, दि. 4 ( राधिका कुलकर्णी): लेखाचे शीर्षक वाचल्यानंतर मनात आले असेल की, हे काय विचारणे झाले? 

तर हो. 

कसे?

मला सांगा, पृथ्वीचे वय किती? Age of the Earth?

असेल चार हजार पाचशे दशलक्ष वर्षे. 4500 billion years.

आणि तुमचे वय? अगदी तुमचे नका सांगू, आज दिसणाऱ्या मानवाचे वय? Age of  human being?

असेल दोन तीन लाख वर्षांचे. 2-3 lakh years.

म्हणजे पृथ्वीसाठी तिचे पाळण्यातले अपत्य असल्यासारखेच आपण, नाही का? पण आपला अतिशहाणपणा बघा! येत्या काही वर्षांत जिवंत राहू की नाही अशी भीती निर्माण झालीय माणसाच्या मनात. म्हणजेच आधी स्वतःला वाचवायची वेळ आलीय तेव्हा स्वतःला वाचवा! पृथ्वीला कुठे वाचवायला निघालात? स्वतःला बुद्धिमान म्हणवता आणि ‘पृथ्वीला वाचवा’, ‘पर्यावरण वाचवा’ म्हणून वर्षातले काही दिवस गळे काढता हीच का तुमची बुद्धी आणि हेच का ते शहाणपण? पृथ्वी स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहे! समर्थ नाहीत ते आपण… Child of the Earth, Fear of extinction, The Earth is able to save herself not we…

अमुक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर, तमुक प्राण्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच शिल्लक राहिलीय असे म्हणत तुम्ही मोहिमा उघडायच्या! शहरांमध्ये बाळाला घास भरवताना,’हा घास चिऊचा’ असे दाखवण्यापुरती तरी चिमणी राहिलीय? पाऊस पडल्यानंतर पैसा नावाचा छोटा सरपटणारा प्राणी, गांडुळे, गोगलगायी अगदी शहरातल्या घरासमोरच्या अंगणात ३५-४० वर्षांपूर्वी दिसत असत. झाडांवर चिमण्या, कावळे, मैना, पोपट, टिटव्या, साळुंक्या, भारद्वाज,बुलबुल असे कितीतरी पक्षी मुलांना आपल्या आसपासच दिसत असत. कुठे गेले हे? वड-पिंपळ, कडुनिंब, पेरू, पपनस, रामफळ,सीताफळ, आंबा अशी विविध झाडे घरोघर पुढच्या – मागच्या अंगणात दिसत असत. अंगण आणि झाडे आता दिसतात???

Are the courtyards and trees and birds visible now in the cities?

आपल्या देशात याच ३५-४० वर्षांपूर्वीपर्यंत पावसाळा, हिवाळा, उन्हाळा हे आज्ञाधारक विद्यार्थ्यांसारखे त्यांच्या त्यांच्या ठरलेल्या महिन्यांमध्ये हजेरी लावत असत. त्यांच्या याच आज्ञाधारकपणावर विसंबून शेतकऱ्यासह सगळे आपापले कामाचे व इतर कोष्टक ठरवत असत. पाऊस अगदी कोसळला तरी थोड्या वेळाने रस्त्यावरचे पाणी निचरा होऊन गेलेले असायचे. कुठेही नाले –गटार तुंबणे नाही की घरात पाणी शिरणे नाही. तुम्ही नव्हता तेव्हा नैसर्गिक ओढे नाले बुजवणारे कुणी नव्हते. समुद्र हटवून खारफुटीसारख्या पाणथळ वनस्पती तोडून तिथे अतिक्रमण करणारे कुणी नव्हते आणि निसर्गापेक्षा ‘मीच श्रेष्ठ ‘ म्हणणारेही कुणी नव्हते! पृथ्वी कशी आपल्याच डौलात राहत होती! पक्षी, प्राणी, कीटक, जलचर, वनस्पती, डोंगर, नद्या  सगळे कसे आपापल्या तब्येतीत होते. पृथ्वीवरच्या निर्मितीला कुणी आव्हान देत नव्हते. पंचमहाभूतांचा मेळ बघण्यासारखा होता! कुणी कुणावर कुरघोडी करत नव्हते, ना कुणी अतिक्रमण! जैवविविधता खऱ्या अर्थाने पृथ्वी आपल्या अंगाखांद्यावर नांदताना पाहत होती. आपला मान ठेऊन शिस्तीत राहणारी ही आपली निर्व्यसनी, समाधानी अपत्ये तिला शांत, थंड, टवटवीत, प्रसन्न ठेवत होती. पण तिच्याच कुशीतून शहाण्या माणसाबरोबरच अतिशहाणा, अविचारी आणि कायम असंतुष्ट माणूस उत्पन्न झाला आणि पृथ्वी आपली थंड वृत्ती, शांत स्वभाव, टवटवीतपणा, प्रसन्नता हळूहळू गमावत चालली. औद्योगिक क्रांतीनंतर झपाट्याने तिचे रूप – गुण बदलत गेले. All seasons were in time. Living creatures were seen together. After Industrial Revolution everything changed.

पृथ्वीवर सुरुवातीपासून जन्मलेल्या जीवजाती कायम टिकून राहिल्या असतील का? 

नेचर मासिकाच्या हवाल्याने गुगलवर अशी माहिती मिळाली की, सन २०५०पर्यंत जमिनीवरील १५ ते ३७ टक्के प्रजाती नष्ट होण्याचा अंदाज आहे. सजीव प्रजाती नष्ट होण्याचे ५ कालखंड मानले जातात. आपला कालखंड सहावा! त्यातही दोन प्रकार दिसतात. सामूहिक नामशेष होणे आणि टप्प्याटप्प्याने नामशेष होणे. मिथेन वायू प्रादुर्भाव, समुद्रापातळी घटणे, हिमयुग, अशनी घात इत्यादींमुळे काही अब्ज वर्षांपूर्वी काही प्रजाती एकत्रित नष्ट झाल्या.  आधुनिक काळात प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, पूर, ज्वालामुखी, वणवा, वादळ इत्यादींमुळे तसेच मानवनिर्मित कारणांपैकी चोरटी शिकार व तस्करी, जंगलतोड, औद्योगिक शेती,  प्रदूषण व वातावरण बदल, त्यामुळे होणारे विविध आजार, इत्यादींमुळे सजीव प्रजाती टप्प्याटप्प्याने नामशेष झालेल्या दिसतात. मात्र माणूसच फार पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात सजीव नष्ट होण्यास कारणीभूत ठरत आला आहे. ‘वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर’ या स्वयंसेवी संस्थेच्या एका अहवालानुसार दरवर्षी दहा हजार प्रजाती नष्ट होत आहेत. सजीव प्रजाती नष्ट होण्याचा पहिला कालखंड म्हणजे ‘ऑर्दोव्हिसियन’.  हा ४५० ते ४४० दशलक्ष वर्षांपूर्वीचा होता आणि त्या काळात ६०-७० टक्के सजीव नष्ट झाले. ‘लेट डिव्होनियन’ हा ३७५ ते ३६० दशलक्ष वर्षांपूर्वीचा दुसरा कालखंड. या काळात सजीव प्रजाती टप्प्याटप्प्याने नामशेष झाल्या. ‘पर्मिअन’ या तिसऱ्या कालखंडात ९६ टक्के समुद्री जलचर आणि ७० टक्के जमिनीवरचे म्हणजे सर्वात जास्त सजीव या काळात नष्ट झाले. २५१ दशलक्ष वर्षांपूर्वीचे हे युग ‘ग्रेट डायिंग पिरीयड’ म्हणूनही ओळखले जाते.  ‘ट्रायसिक’ या २०० दशलक्ष वर्षांपूर्वीच्या कालखंडात ७५ टक्के सजीव नष्ट झाले. ‘क्रेटासिअस’ या अलीकडच्या ६५  दशलक्ष वर्षांपूर्वीच्या कालखंडात अशनि घातामुळे अनेक प्रजाती अस्तास गेल्याचे मानले जाते. source- partial list from image: Extinction Intensity.png

मानव हाही पृथ्वीवरचा एक प्राणीच! तो स्वतःला निसर्गापेक्षा श्रेष्ठ समजू लागलाय. पृथ्वीवरच्या परिसंस्थेची तो मोडतोड, हेळसांड करीत आहे आणि त्यामुळे प्रदूषण वाढून, हवामान बदल होऊन त्याच्याच जगण्याचा तो कडेलोट करीत आहे हे त्याच्या गावीही नसावे? ज्वालामुखीच्या जवळ घर बांधायचा अट्टहास करायचा आणि हवामान बदलाच्या गप्पा मारतामारता ज्वालामुखी घराच्या दिवाणखान्यातच आला म्हणून रडायचे!  अशी माणसाची वागण्याची पद्धत झालीय. ज्वालामुखीची जागा तीच होती, आहे, असेल! समुद्र,नद्या, नाले, ओढे, टेकड्या, डोंगर, पर्वत, इत्यादी आहे तिथेच असतील! प्राणी, पक्षी, कीटक व जलचर प्राणीही त्यांच्या त्यांच्या जागीच असतील!  मूर्खपणाने वागतोय तो मानव प्राणी!  या सगळ्यांना धक्का न लावता तुम्ही इमारती बांधल्या असत्या, भौतिक प्रगती केली असती तर सर्व सजीवांसह ही परिसंस्था टिकून राहिली असती. निसर्गावर हवे तसे अतिक्रमण करताना माणूस काय अमरपट्टा घेऊन जन्माला आलाय का? आधीच्या पाच कालखंडात असंख्य सजीव प्रजाती नष्ट झाल्या तसा माणूसही नष्ट होऊ शकतो हे का नाही लक्षात घेत तो? Is Man immortal?  Note that the earth is going to be where it is! The question is whether we will survive or not?!

यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना आहे परिसंस्थेचे पुनरुज्जीवन!  आपण खरेच गंभीरपणे विचार करणार आहोत का या संकल्पनेवर? अन्यथा, मानवजातीचा विनाश ठरलेलाच आहे… पृथ्वी आहे तिथेच असणार आहे. आपण विचार करायचा आहे की, आपण, आपली मुलेबाळे पृथ्वीवर जगू द्यायची की नाही? The concept of this year’s World Environment Day is to revitalize the ecosystem! We want to think that do we want our children to live on the earth or not?

राधिका कुलकर्णी

मुक्तपत्रकार व क्लायमेट रियालिटी लीडर

k_radhika@hotmail.com

ML/KA/PGB
4 Jun 2023


mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *