WHO कडून कोरोना झाला आणीबाणी वर्गवारीतून हद्दपार
जिनिव्हा, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या साडे-तीन वर्षांपासून अवघ्या जगासाठी साडेसाती होऊन राहीलेला कोरोना अखेर हद्दपार झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. कोरोनाची लाट संपली असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली आहे. कोविड 19 आता जागतिक आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency) हटवण्यात आली असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपात्कालीन परिस्थितीबाबतच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव डॉ. टेड्रोस यांनी म्हटले की, काल आपत्कालीन समितीची 15 वी बैठक झाली. यामध्ये, कोविड-19 ला जागतिक आरोग्य आणीबाणीच्या कक्षेबाहेर घोषित करावे, अशी शिफारस करण्यात आली. ही शिफारस आपण स्वीकारत असल्याचे डॉ. टेड्रोस यांनी म्हटले.WHO ने सांगितले की 30 जानेवारी 2020 रोजी कोविडला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली. जागतिक आरोग्य आणीबाणी मागे घेतली असली तरी कोरोना अजूनही जागतिक आरोग्यासाठी धोका आहे, असे WHO ने स्पष्ट केले. डब्ल्यूएचओने सांगितले की, गेल्या वर्षभरात कोविडच्या प्रकरणांमध्ये झालेली घट लक्षात घेऊन सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणीतून कोरोना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.SL/KA/SL6 May 2023