अशोक चव्हाणांचे पत्ते अद्याप खुले नाहीत , तर वडेट्टीवारानी ठेवले कानावर हात

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “आज मी विधानसभा अध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेस कार्यसमिती, पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि विधीमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचाही मी राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये असताना मी प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. कोणाबद्दल मी तक्रार करणार नाही. वैयक्तिक कोणाबद्दलही माझ्या मनात वेगळी भावना नाही. पुढील राजकीय दिशेबाबत अद्याप मी काहीही निर्णय घेतलेला नाही. याबाबत विचार करून एक-दोन दिवसात माझी भूमिका स्पष्ट करेल.” असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
दरम्यान विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक आहे असे म्हटले आहे.त्यांनी अचानक का निर्णय घेतला माहीत नाही, त्यांची माझ्याशी चर्चा झाली नाही. मी २००७ पासून मी त्यांच्या बरोबर काम केले आहे म्हणून कदाचित माझी चर्चा होते . ते गेले म्हणून विजय वडेट्टीवार जातील असे म्हटले जाते आहे,पण त्यात तथ्य नाही असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना सर्व काही दिले आहे, आज पक्ष लोकशाही आणि संविधान वाचविण्याची लढाई करीत असताना सर्व काही मिळालेले हे लोक काँग्रेसला सोडून जात आहेत हे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. त्यांनी ट्विट संदेश प्रसारित करीत तरीही आम्ही सर्व ताकदीनिशी धर्मांध आणि हुकूमशाही वृत्तीच्या भाजपा विरोधात लढत राहू असे म्हटले आहे.
ML/KA/SL
12 Feb. 2024