व्यंगचित्राखाली काय लिहू.. गप्प बसा..!
पुणे दि ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : व्यंगचित्रे काढायला माझे हात रोजच शिवशिवत असतात; परंतू हवी तशी निवांत बैठक जुळून येत नाही. त्यामुळे माझी व्यंगचित्रे भाषणातून बाहेर पडतात. मी व्यंगचित्रात-चित्रात रमणारा माणूस आहे. कला तुम्हाला जे दाखवू शकते ते विलक्षण असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी केले.
उपस्थितांच्या आग्रहाखातर आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे व्यंगचित्र काही क्षणांत रेखाटून त्यांनी ‘या व्यंगचित्राखाली ‘आता गप्प बसा’ असे लिहू का’ असा मिश्किल प्रश्नही केला.
जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त युवा संवाद सामाजिक संस्थेच्या वतीने व कार्टूनिस्ट्स् कंबाईन यांच्या सहकार्याने पुण्यात बालगंधर्व कला दालनात प्रथमच ‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाचे उद्घाटन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 7 मे पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
व्यासपीठावर युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड, कार्टूनिस्ट्स् कंबाईनचे माजी अध्यक्ष चारुहास पंडित, विद्यमान अध्यक्ष संजय मिस्त्री मंचावर होते. सुरुवातीस राज ठाकरे यांनी प्रदर्शनातील व्यंगचित्रांची पाहणी करून प्रदर्शनात मांडण्यात आलेली व्यंगचित्रे फार अप्रतिम असल्याचे नमूद केले. या प्रदर्शनात जगभरातील 254 तर देशातील 100 व्यंगचित्रकारांच्या बोलक्या कलाकृती आहेत.
स्वागतपर प्रास्ताविकात धनराज गरड म्हणाले, पुण्यात विद्यमान संस्थांतर्फे पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यंगचित्रकारांचा सहभाग असलेले प्रदर्शन भरविण्यात आले आहे. भविष्यात जागतिक व्यंगचित्रकार दिनाचे औचित्य साधून साखळी पद्धतीने व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्याचा मानस आहे. धनराज गरड यांनी राज ठाकरे यांचा सन्मान केला.
संजय मिस्त्री यांनी जागतिक व्यंगचित्र दिनाविषयी माहिती दिली तर चारुहास पंडित यांनी राज ठाकरे यांना अनोखी कलाकृती भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले. या प्रसंगी राज ठाकरे यांच्या हस्ते राम सोनकांबळे, बाळासाहेब धोका, पल्लवी जगताप, योगेंद्र भगत, विश्वास सूर्यवंशी, अतुल पुरंदरे, किशोर शितोळे, आकाश गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
SL/KA/SL
5 May 2023