काय आहेत अर्थसंकल्प सादरीकरणाची वैशिष्ट्ये
नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नववर्ष सुरु होताच देशातील सर्वसामान्यांसह सर्वांनाच वेध लागतात ते केंद्रीय अर्थसंकल्पाचे. सुरुवातीला अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सादर होत असे. मात्र मागील काही वर्षांपासून मोदी सरकारने फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच अर्थसंकल्प सादरी करण्यास सुरुवात केली आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज करदाते, शेतकरी आणि महिलावर्गासाठी दिलासादायक अर्थसंकल्प सादर केला.या निमित्ताने आजच्या अर्थसंकल्पाची आणि याआधीच्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाची काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊया.
- आतापर्यंत सलग ८ वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा मान अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांना मिळाला.
- सर्वाधिक लांब लचक अर्थसंकल्पीय भाषण २ तास ४१ मिनिटे निर्मला सितारामन यांनी केले आहे.
- यावर्षी ५० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा अर्थसंकल्प सादर झाला.
- १९७७ मध्ये, हिरुभाई मुळजीभाई पटेल यांनी सर्वात लहान अंतरिम अर्थसंकल्पीय भाषण दिले होते. ज्यामध्ये फक्त ८०० शब्द होते.
- ब्रिटिशकालीन परंपरेनुसार फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी ५•०० वाजता अर्थसंकल्प सादर केला जात असे. १९९९ मध्ये अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या कार्यकाळात बजेटची वेळ बदलून सकाळी ११•०० वाजता करण्यात आली. ती वेळ अजूनही कायम आहे.
- २०१७ मध्ये, अर्थसंकल्प सादर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि १ एप्रिल रोजी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सक्षम करण्यासाठी अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलून १ फेब्रुवारी करण्यात आली.
- २०१७ -१८ पर्यंत रेल्वे अर्थसंकल्प वेगळा आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प वेगळा सादर केला जात होता. पण २०१७ मध्ये ही ९२ वर्षांची परंपरा संपवत रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला. (यापूर्वी रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्र्यांनी तर केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केलेले होते.)
- माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात अर्थमंत्री म्हणून एकूण १० वेळा अर्थसंकल्प सादर केला. [हा अर्थसंकल्प सलग १० वर्ष नव्हता]
- २०२१ मध्ये पहिले “डिजीटल बजेट” सादर झाले.
SL/ML/SL
1 Feb. 2025