पश्चिम रेल्वेचे स्वदेशी टक्कर विरोधी प्रणाली ‘कवच’

मुंबई, दि. ४ : पश्चिम रेल्वे लवकरच आपल्या लोकल ट्रेन सेवांमध्ये स्वदेशी टक्कर विरोधी प्रणाली ‘कवच’ बसवणार आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. ‘कवच’ ही मेक इन इंडिया अंतर्गत विकसित केलेली एक अत्याधुनिक ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली आहे. ती सध्या दिल्ली-मुंबई कॉरिडॉर आणि इतर काही प्रमुख मार्गांवर वापरली जात आहे. आता ती मुंबईच्या लोकल ट्रेन नेटवर्कमध्येही कार्यान्वित होणार आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस ही प्रणाली पश्चिम रेल्वेमध्ये बसवण्यात येणार आहे. चर्चगेट-विरार-डहाणू मार्गावर चालणाऱ्या सर्व लोकल ट्रेनमध्ये ‘कवच’ प्रणाली बसवली जाणार आहे. या मार्गावर दररोज ११० EMUs (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) आणि १४०० हून अधिक लोकल ट्रेन सेवा कार्यरत आहेत, ज्यात दररोज ३० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.
पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे की ‘कवच’ प्रणाली ही AWS पेक्षा अधिक प्रगत आणि सक्षम आहे. ही प्रणाली ट्रेन आणि सिग्नलिंग स्टेशन यांच्यात तात्काळ संवाद साधते, म्हणजेच कोणतीही अपात्कालीन घटना घडल्यास तिची माहिती लगेच सिग्नलिंग सिस्टमपर्यंत पोहोचते. त्यामुळे रेल्वे प्रशासन त्वरित पावले उचलू शकते आणि संभाव्य अपघात टाळता येतो. यामुळे मानवी चुका कमी होतात आणि संपूर्ण यंत्रणेची कार्यक्षमता वाढते. जर लाल सिग्नलचे उल्लंघन झाले किंवा अचानक एखादी व्यक्ती ट्रेन समोर आली तर ‘कवच’मधील स्वयंचलित ब्रेकिंग सिस्टम त्वरित सक्रिय होऊन संभाव्य अपघात टाळण्याची शक्यता या प्रणालीमध्ये आहे. कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही, इन-कॅब सिग्नलिंगमुळे चालकाला ट्रेनच्या कॅबमधूनच थेट सिग्नल आणि सूचना मिळतात, त्यामुळे निर्णय घेणे अधिक सोपे आणि वेगवान होते.
SL/ML/SL