23 एप्रिलपासून मुंबईतील पाणीपुरवठा होणार पूर्ववत

 23 एप्रिलपासून मुंबईतील पाणीपुरवठा होणार पूर्ववत

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे झालेली गळती दुरुस्ती करण्याचे काम मुंबई पालिकेच्‍या पाणीपुरवठा विभागाने 30 दिवसांऐवजी अवघ्या 18 दिवसात पूर्ण केले . हा जलबोगदा पूर्ण क्षमतेने भरुन कार्यान्वित करण्यासाठी अजून 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रविवार 23 एप्रिल पासून मुंबई महानगराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित आहे.

भांडूप संकुल येथील जलशुध्दीकरण केंद्रास 75 टक्के पाणीपुरवठा हा गुंदवली ते भांडुप संकुल दरम्यानच्या 5,500 मिलीमीटर व्यासाच्या 15 किलोमीटर जलबोगद्याद्वारे होतो. सदर जलबोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेचे खोदकाम सुरू असताना हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. ही गळती दुरुस्तीसाठी सदर जलबोगदा 31 मार्च पासून बंद करण्यात आला होता. त्यामुळे शहरात 31 मार्च पासून जलबोगदा पाणी गळती दुरुस्‍तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंदाजे 30 दिवस कालावधीसाठी 15 टक्‍के कपात जाहीर करण्यात आली होती.

हा जलबोगदा जमिनीपासून सुमारे 100 ते 125 मीटर खोलवर आहे. हानी पोहचल्याचे ठिकाण भांडुप संकुल झडप (शाफ्ट) पासून सुमारे 4.2 किलोमीटर अंतरावर होते. सुमारे 125 मीटर खोल व 4.2 किलोमीटर लांब आतमध्ये शिरुन जलबोगद्याची दुरुस्ती करणे, हे जल अभियंता विभाग आणि पाणीपुरवठा प्रकल्प विभागासमोर आव्हान होते. आज या जलबोगदा दुरूस्तीचे काम पूर्ण झाले . अंदाजे 30 दिवसांचा कालावधी दुरुस्तीकरीता अपेक्षित असताना प्रत्यक्ष 18 दिवसांमध्येच ही दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. Water supply in Mumbai will be restored from April 23

दुरुस्ती पूर्ण केल्यानंतर हा जल बोगदा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यापूर्वी पाण्याने भरून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जल अभियंता विभागातर्फे उद्या 19 एप्रिल पासून आवश्यक त्या झडपांच्‍या प्रचलनास तातडीने सुरूवात करण्यात येणार आहे. जल बोगदा पाण्याने भरून घेण्यासाठी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे. असे असले तरी, या अतिरिक्त पाण्याची पूर्तता करताना सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार नाही, याची देखील प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करुन जल बोगदा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार आहे. या सर्व बाबी विचारात घेता, मुंबई महानगराचा पाणीपुरवठा रविवार 23 एप्रिल पासून पूर्ववत होणे अपेक्षित आहे 23 एप्रिलपासून मुंबईतील पाणीपुरवठा होणार पूर्ववत

ML/KA/PGB
18 Apr 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *