दुष्काळ स्थितीसाठी पाण्याचे नियोजन केले जात आहे
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात काही भागात दुष्काळी परिस्थिती आहे, मराठवड्यात परिस्थिती गंभीर आहे , या पार्श्वभूमीवर, पाणी साठ्याचं नियोजन जुलै महिन्यापर्यंत करण्यात आलं असून प्रथम पिण्यासाठी पाणी नंतर शेतीसाठी आणि नंतर उद्योसाठी पाणी अशाच सूत्रानुसार पाण्याचं वाटप करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानरिषदेत सांगितलं. आटलेल्या प्रकल्पांमधून गाळ काढण्यावर भर दिला जाईल या गाळाचा उपयोग शेतकऱ्यांना शेतीसाठी होणार आहे तसंच जलयुक्त शिवार योजना मोठ्या प्रमाणात हाती घेतली जाईल,असं त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या विविध विषयांवरील चर्चेला ते उत्तर देत होते.
महायुती सरकारनं १२१ सिंचन प्रकल्पांना ९९ हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यामुळे १५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी सरकार मोठ्या प्रमाणावर प्रकल्प हाती घेत आहे , येत्या काळात मागेल त्याला सौरपंप योजने अंतर्गत साडे आठ लाख सौरपंप देण्यात येतील, तसंच सगळ्या उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर आणण्यात येतील* अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत फिडर सौरऊर्जेवर आणण्याच्या योजने अंतर्गत नामांकित कंपन्यांनी आठ हजार मेगावॉटच्या निविदा भरल्या असून या योजनेमुळे शेतकऱ्यांना बारा तास वीज उपलब्ध होईल असं त्यांनी सांगितलं.रोहित्र दुरुस्तीसाठी नवी योजना आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महायुती सरकारच्या काळात २४ हजार पोलिसांची भरती झाली असून मराठा आरक्षणासह १७ हजार पोलीस भरतीची जाहिरात आज प्रसिद्ध झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी महाराष्ट्राची क्षमता वाढली असून यासंदर्भातला यंत्रणा प्रकल्प एल अँड टीच्या सहकार्याने लवकरच सुरू होईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अंमली पदार्थांविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबलं असून सर्वोच्च प्राधान्य देऊन कारवाईचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत . प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंध कक्ष स्थापन करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. केमिकल कारखान्यातील मशिनचा वापर करून अंमली पदार्थ बनवले जातात यासाठी बंद आणि सुरू असलेले केमिकल कारखाने चौकशीची मोहिम राबवली जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं.
ML/KA/SL
1 March 2024