जागतिक युद्धग्रस्त अनाथ स्मरण दिन : युद्धाच्या झळा कोणात्याच लहानग्याला बसू नयेत, यासाठी देशांच्या सीमा ओलांडून मानवतेचा विचार महत्वाचा

 जागतिक युद्धग्रस्त अनाथ स्मरण दिन : युद्धाच्या झळा कोणात्याच लहानग्याला बसू नयेत, यासाठी देशांच्या सीमा ओलांडून मानवतेचा विचार महत्वाचा

राधिका अघोर

जगभरात, सहा जानेवारी हा दिवस, युद्धग्रस्त अनाथ मुलांचं स्मरण करणारा दिन म्हणून पाळला जातो. जेव्हापासून मानव अस्तित्वात आला, तेव्हापासून मानवांमधे संघर्ष तर सुरू आहेच. मात्र, नंतर, जसजशी मानवाची इतरांवर अधिराज्य गाजवण्याची महत्वाकांक्षा आणि सत्तेचा लोभ वाढत गेला, तसतसे युद्धाला आणखी व्यापक स्वरूप आले. माणसाच्या प्रगतीनंतर, देशांची परस्परांवर होणारी आक्रमणं अधिक भीषण आणि विध्वंसक ठरली.

आज माणसाकडे शत्रूला घरबसल्या नेस्तनाबूत करु शकेल, अशी शस्त्रास्त्र आहेत, जी एखादी भूमी संपूर्णपणे नष्ट करु शकतात. इतरांवर वर्चस्व गाजवण्याच्या हौसेपायी, माणसानं सगळ्या जगाला युद्धाच्या खाईत लोटलं आहे. आणि झालेली आक्रमणे थोपवण्यासाठी, देश सुरक्षित ठेवण्यासाठी, इतर देशांनाही आक्रमाणाला उत्तर द्यायला युद्धात उतरावं लागतं, कधी शांतता प्रस्थापित करण्यासाठी युद्ध केली जातात. कारणे वेगवेगळी असली, तरीही युद्ध ही आजची वास्तविकता आहे, आणि त्यातून भीषण वास्तविकता आहे, युद्धाचे परिणाम.

राज्यकर्ते युद्ध करण्याचा निर्णय घेतात, किंवा त्यांना घ्यावा लागतो आणि सैन्यशक्ती हे युद्ध करते. मात्र त्याचे परिणाम भोगावे त्या युद्धाला अजिबात जबाबदार नसलेल्या सर्वसामान्य नागरिकांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि निष्पाप निरागस लहानग्या मुलांना.

युद्धात शहीद झालेले सैनिक किंवा युद्धग्रस्त भागात असलेल्या नागरिकांवर झालेल्या हल्ल्यामुळे जेव्हा नागरिक मारले, जातात, तेव्हा त्यांची मुले अनाथ होतात. एका आकस्मिक संकटाने, त्यांचं अख्खं आयुष्य बदलून जातं. खरं तर उद्ध्वस्त होऊन जातं. भीषण हल्ल्यात, त्यांच्यासमोर कधीकधी त्यांच्या आईवडलांचा मृत्यू होतो. आणि त्यानंतरही युद्धाचा सावटात त्यांना त्यांचं आयुष्य घालवावं लागतं. ह्या मुलांच्या मनावर त्याचा दीर्घकालीन परिणाम होतो.

युद्धाची झळ सोसणाऱ्या ह्या निष्पाप अनाथ मुलांच्या वेदनांची सुजाण जगाला आठवण व्हावी, त्यांच्या संरक्षणासाठी, त्यांचं आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा, याची जाणीवजागृती करून देण्यासाठी, ६ जानेवारी हा दिवस पाळला जातो.

नववर्षांची आनंदाने सुरुवात करताना, आपल्याला ह्या दुर्लक्षित समाजघटकाचीही जाणीव राहावी, म्हणून सहा जानेवारी हा दिवस निवडण्यात आला आहे. इतर अनाथ मुलांपेक्षाही ह्या मुलांची स्थिती अधिक चिंताजनक असते. त्यांची केवळ बाह्य नाही, तर मानसिक काळजी घेणंही आवश्यक असते.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झालेल्या भीषण मानवहानीनंतर, हा प्रश्न जगाला भेडसाऊ लागला, आणि त्याची दाहकता ही कळली. काश्मीर, ईशान्य भारतातला काही प्रांत अशा भागात कित्येक वर्षे असलेल्या दहशतवादाच्या छायेत वाढलेली मुलं, महायुद्धानंतरही सातत्याने जगाच्या कोणत्या तरी भागात सुरू असलेल्या युद्धग्रस्त भूमीतली मुलं, आज, गेल्या कित्येक दिवसांपासून पश्चिम आशियातले अनेक देश युद्ध- यादवी युद्धाच्या झळा सोसत आहेत.

युद्धग्रस्त भयामुळे अनेकांना आपले देश सोडून कुठेकुठे निर्वासित व्हावं लागलं आहे. अशा कुटुंबातली मुलं, त्यांचं सगळं लहानपण पार होरपळून जातं. चार वस्तू किंवा थोडी आर्थिक मदत त्यांना पुरेशी नसते. त्यांचं भविष्य नीट व्हावं यासाठी त्यांना मोठा आधार हवा असतो. महामारीसारखे संकट आले तर अशा मुलांची अधिकच बिकट अवस्था होते.
ज्या परिस्थितीत अशी अनाथ मुलं वाढतात, ज्या संकटांचा ते सामना करतात, त्या कोवळ्या वयात जर त्यांना आधार मिळाला नाही, तर कदाचित ह्या मुलांना कायमचं नैराश्य येऊ शकतं किंवा कडवट अनुभवातून ते गुन्हेगारीकडे वळतात, दहशतवादी, कट्टरपंथी हिंसक कारवाया करण्यासाठी मग अशा मुलांचा वापर केला जातो. आणि त्यातून, पुन्हा ह्या मुलांची संकटाकडे वाटचाल होते, हे एक न संपणारे दुष्टचक्र तयार होते.

हे सगळंच थांबवण्यासाठी, ह्या मुलांकडे सहानुभूतीने पाहण्याची गरज आहे. त्यांच्या समस्या हळुवारपणे आणि नेटाने सोडवण्याची गरज आहे.
ह्या मोहिमेची सुरुवात पहिल्यांदा फ्रांसमध्ये झाली. अशा मुलांचे भविष्य सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी काही संस्था एकत्र आल्या. तेव्हापासून ही चळवळ सुरू आहे. यंदाच्या दिनाची संकल्पना, “अनाथांच्या आयुष्यालाही अर्थ आहे” अशी असून, अनाथ मुलांकडे जगाचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे. (“Standing Up for War-Affected Children”).

महायुद्धानंतर, अशा मुलांची संख्या खूप वाढली होती, आज त्या संख्येत तुलनेनं घट झाली असली, आज युद्धग्रस्त वातावरणात वाढलेली एक प्रौढ पिढी समाजात आहे. त्या पिढीने काय सहन केलं याची जाणीव त्यांनाच आहे, आणि म्हणूनच, त्यांच्यासारखं बालपण इतर कुणाच्या वाट्याला येऊ नये, यासाठी अशा पिढीनं संवेदनशीलपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.
आजही जेव्हा जग संघर्षाच्या झळा झेलत आहे, त्यावेळी, जगभरातल्या ह्या कोवळ्या मुलांचं आयुष्य युद्धाच्या झळा होरपळून टाकणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी, केवळ मानवतेच्या जाणीवेनं विचार करत, सीमेची बंधने न ठेवता, घेण्याची गरज आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *