वानखेडे स्टेडीअमवर रोहीत शर्माच्या नावाचं स्टॅण्ड

मुंबई, दि. १६ : मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी खेळाडू आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या नावाने वानखेडे स्टेडियममध्ये विशेष स्टँड उभारला आहे. याचे नुकतेच अनावरण करण्यात आले. हा सन्मान त्याच्या उल्लेखनीय क्रिकेट कारकीर्दीचा आणि मुंबई क्रिकेटमधील योगदानाचा गौरव करण्यासाठी दिला गेला आहे. वानखेडे स्टेडियममधील या विशेष सोहळ्याला रोहित शर्मा यांचे आई-वडील पूर्णिमा आणि गुरुनाथ शर्मा उपस्थित होते. त्यांनी स्टँडचे उद्घाटन करण्यासाठी बझर दाबला, आणि त्यांच्यासोबत रोहितची पत्नी रितिका सजदेह, संघातील काही सहकारी आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
या सन्मानाच्या सोहळ्यात रोहितने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “वानखेडे स्टेडियममध्ये माझ्या नावाचा स्टँड असणे हा माझ्यासाठी एक स्वप्नवत क्षण आहे. मी लहानपणी मुंबईसाठी आणि भारतासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले होते, परंतु आज हा विशेष सन्मान मिळणे हे अप्रतिम आहे.”
त्याने असेही सांगितले की यापुढे वानखेडेवर खेळताना त्याला वेगळेच समाधान वाटेल, कारण स्वतःच्या नावाचा स्टँड असलेल्या स्टेडियममध्ये खेळण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही.
रोहित शर्मा हा भारताचा एक महान फलंदाज आणि यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याने भारतासाठी अनेक महत्त्वाचे विजय मिळवले असून वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये आपली छाप उमटवली आहे.
२०१९ विश्वचषकातील पाच शतकं, २०२३ क्रिकेट विश्वचषकात उत्कृष्ट नेतृत्व आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी केलेल्या कामगिरीमुळे तो भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचा चेहरा बनला आहे.