लेबननमध्ये पेजरच्या स्फोटानंतर वॉकीटॉकी आणि रेडिओचा स्फोट; ९ जणांचा मृत्यू, ३०० जण जखमी, ‘युनिट-८२०० घडवले स्फोट
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर यामध्ये तब्बल २,८०० लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. हेझबोलाहच्या काही अधिकाऱ्यांकडील हजारो पेजर्सचे स्फोट झाले होते. यानंतर आता आज (१८ सप्टेंबर) पुन्हा एकदा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण लेबनॉन आणि उपनगरात हेझबोलाहने वापरलेल्या रेडिओचा आणि काही वॉकीटॉकीचा स्फोट झाला आहे. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून ३०० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने हे स्फोट घडवून आणल्याचे दावे सुरुवातीला केले जात होते. मात्र इस्रायलची गुप्तचर सायबर शाखा ‘युनिट ८२००’ने हे हल्ले घडवून आणले आहेत. ही संस्था इस्रायलच्या मोसादपेक्षा वेगळी आहे.