कै.बाळासाहेब वाघ यांचं आयुष्य हे समाजसेवेचे एक अखंड विद्यापीठ – मंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.१९ :- शिक्षण, सहकार, जलसंधारण, पर्यावरण, समाजसेवा यासह विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे कै.बाळासाहेब वाघ यांचं आयुष्य हे समाजसेवेचे एक अखंड विद्यापीठ होते. कै.बाळासाहेब वाघ यांनी निर्माण केलेल्या संस्था, मूल्ये आणि विचार हेच त्यांचे खरे स्मारक आहेत. या महाराष्ट्र धुरिणींच्या विचारांवर आपण सर्वांनी वाटचाल करायला हवी असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
कै.बाळासाहेब देवराम वाघ यांच्या ९३ व्या जयंती निमित्त के.के.वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, मैदान नाशिक येथे जयंती कार्यक्रम पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात,खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभाताई बच्छाव, खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, श्रीमती शंकुतला वाघ, माजी खासदार प्रतापराव वाघ, माजी आमदार नितीन भोसले, चांगदेवराव होळकर, राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, डॉ.सुनील.ढिकले, अरविंद कारे ,माणिकराव बोरस्ते, डॉ.दिनेश बच्छाव, डॉ.अनिवृद्ध धर्माधिकारी, अशोक वाघ, अमोल कोल्हे, सुरेश खेताडे, लक्ष्मण सावजी, डी. के.जगताप, राजेंद्र डोखळे, ॲड. लांडगे, ॲड. इंद्रभान रायते, सुरेश भोज, गजानन शेलार, संजय होळकर ,
के.के.वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, संचालक अजिंक्य वाघ, संस्थेचे सचिव के.एस.बंदी, डॉ. व्हि.के.
पाटील, के.एन.नांदुरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कै.बाळासाहेब वाघ यांना आदरांजली वाहत मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, शिक्षण हे अतिशय महत्वाचे असल्याने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजातील नागरिकांना शिक्षणाची कवाड खुली करून दिली. त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या कार्याचा वसा घेऊन महाराष्ट्रातील महाराष्ट्र धुर्मिणींनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्यामध्ये पद्मश्री काकासाहेब वाघ, कै.बाळासाहेब वाघ यांचे नेतृत्व आहे. के.के.वाघ शिक्षण संस्थेचे वटवृक्ष त्यांनी निर्माण केलं. या समाज धुर्मिणींनी जे काम केलं त्यांच्या विचारांवर आपल्या सर्वांना पुढे जायला हवे असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, कै.वाघ साहेब हे नाव फक्त नाशिक जिल्ह्यासाठीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरले. त्यांनी आयुष्यभर त्यांनी प्रत्येक क्षण समाजाच्या सेवेच्या, शिक्षणाच्या आणि सहकाराच्या उन्नतीसाठी समर्पित केला. त्यांनी पुणे येथील शासकीय कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी.अॅग्री ही पदवी घेतली आणि आपल्या मूळ भूमीला,आपल्या मातीतल्या माणसांना शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त करण्याचे ध्येय त्यांनी मनाशी बाळगले.
त्यांच्या नेतृत्वाखाली के.के.वाघ शिक्षण संस्था आज महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित शैक्षणिक समूहांपैकी एक झाली. कै.वाघ साहेब यांनी नेहमीच सांगितले कि, “शिक्षण हे फक्त पदवी मिळवण्यासाठी नसते, ते माणूस घडवण्यासाठी असते.” हे त्यांचे तत्त्वज्ञान प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मसात केले. त्यांनी संस्थेला केवळ शाळा-महाविद्यालयांच्या स्वरूपात वाढवले नाही, तर मूल्याधिष्ठित शिक्षणसंस्कृती रुजवली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, कै.बाळासाहेब वाघ साहेबांचे योगदान हे संस्थापकाचे नव्हे, तर संस्कारकाचे होते. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यात समाजसेवेचा संस्कार रुजवला. सहकार क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वात कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांचा विश्वास होता की, “सहकार म्हणजे फक्त व्यवसाय नव्हे; तो विश्वासाचा, श्रमाचा आणि माणुसकीचा संगम आहे.” ही तत्त्वे त्यांनी स्वतः आचरणातून दाखवून दिली. राज्याच्या जलसंधारण क्षेत्रातही त्यांनी आपले अमुल्य योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासाचा, विचारांचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल त्यामध्ये. कै.बाळासाहेब वाघ यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. नाशिक जिल्ह्याच्या जडणडणघडणीत त्यांचे योगदान हे अतिशय महत्वाचे आहे. बहुजन समाजाच्या विचार करून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. के.के.वाघ शिक्षण संस्थेचे वटवृक्षात रूपांतर केले. समर्पित होऊन त्यांनी दिलेले हे योगदान अमूल्य आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार दिलीप बनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर संस्थेचे संचालक अजिंक्य वाघ यांनी आभार मानले.ML/ML/MS