‘महाराष्ट्रातील राज्यपाल पदाचा कार्यकाळ सर्वात आनंददायी ’

(उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते , मंत्रिमंडळातील सदस्य तसेच निवडक विधानमंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत दिनांक २५ ऑगस्ट रोजी राजभवन येथे एका अनौपचारिक कार्यक्रमात सत्कार करण्यात आला होता. यावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी केलेल्या भाषणातील निवडक अंश.)
महाराष्ट्रात १३ महिने सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. या काळात मला दोन मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली.
राज्यपाल पदावर नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्रात दाखल झालो, तेव्हा विद्यमान उपमुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री होते तर विद्यमान मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री होते. नंतर उभयतांच्या भूमिकांची अदलाबदल झाली.
परंतु तरी देखील या दोघांमध्ये परस्पर सौहार्द टिकून राहिले आणि संघभावना नेहमीच दिसून आली. यातून महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय संस्कृती आणि उदारमतवादी भूमिका दिसून येते.
महाराष्ट्रातील माझ्या १३ महिन्यांनी मला बहुमोल अनुभव दिला.
महाराष्ट्राच्या राज्यगीतामध्ये दिल्लीचा उल्लेख असलेली एक ओळ आहे (‘दिल्लीचेही तख्त राखितो’). दिल्लीकडे प्रस्थान करताना आपण लोकशाहीच्या तख्ताचे रक्षण करण्यासाठी जात आहो, असे वाटते. माजी राष्ट्रपती डॉ. शंकरदयाल शर्मा यांच्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपाल
पदावरून भारताच्या उपराष्ट्रपतीपदावर जाण्याची संधी मला लाभत आहे, हे माझे मोठे भाग्य समजतो.
आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे. मी पक्षपात न करता सर्वांना समानतेने सेवा देण्याचा प्रयत्न केला. कारण लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही तितकेच महत्त्वाचे असतात. माझ्या राजकीय आयुष्याचा बहुतांश काळ मी विरोधी पक्षातच घालवला आहे. तामिळनाडूत आम्ही कधीच सत्तेत नव्हतो. त्या अनुभवातून समाजाकडे नेहमी व्यापक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, केवळ एका घटकाचे हित पाहू नये ही गोष्ट शिकलो.
विकास हेच आपले सर्वोच्च ध्येय असले पाहिजे. लोकांमध्ये दुफळी निर्माण न करता त्यांना एकत्र आणणे यातच खरा नेतृत्वगुण दिसून येतो. महाराष्ट्रात येण्यापूर्वी मी झारखंडचा राज्यपाल होतो. त्याचबरोबर तेलंगणाच्या राज्यपाल पदाचा व पुदुच्चेरीचा नायब राज्यपाल पदाचा देखील अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याची मला संधी मिळाली. तरीदेखील मी ठामपणे सांगेन की माझा सर्वात आनंददायी कार्यकाळ महाराष्ट्रातीलच होता.
का? कारण मी कुठलीही तडजोड न करणारा राष्ट्रप्रेमी आहे. लहानपणी माझ्या आईने मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कथा सांगितल्या, त्यामुळे माझ्या मनात महाराजांबद्दल अपार आदर निर्माण झाला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देखील मला नितांत आदर आहे. त्यांनी अपार धैर्याने सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि देशाला राज्यघटना दिली.
शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमकांविरुद्ध लढा दिला, तर डॉ. आंबेडकरांनी सामाजिक दडपशाहीविरुद्ध संघर्ष केला. अशा दूरदर्शी नेत्यांमुळे भारत लोकशाही राष्ट्र म्हणून टिकून आहे. त्याउलट आपल्या शेजारील पाकिस्तानला लोकशाही टिकवता आली नाही.
आज महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे आणि भारत २०४७ पर्यंत विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे: विकास तेव्हाच खरा विकास ठरतो जेव्हा तो सर्वसमावेशक असतो—जेव्हा तो अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि समाजातील प्रत्येक घटकाला उन्नत करतो. हेच आपले सामूहिक ध्येय राहिले पाहिजे.
माझ्या कार्यकाळात मला मिळालेल्या आपुलकीसाठी, सहकार्याबद्दल आणि मैत्रीसाठी मी पुनश्च एकदा मनःपूर्वक आभार मानतो.
महाराष्ट्र व येथील जनतेच्या गोड आठवणी मी सोबत घेऊन जाणार आहे.ML/ML/MS