अविश्वास ठरावावर उपसरपंच बाईंनी स्वतःविरोधातच केले मतदान

कोल्हापूर, दि. १३ : कोल्हापूरच्या खिद्रापूर गावातील ग्रामपंचायतीत एक विचित्र प्रकार घडला आहे. अविश्वास ठरावावरील मतदानात स्वतःविरोधातच मतदान करून एका महिलेने उपसरपंचपद गमावले आहे . हा प्रकार समजल्यानंतर महिलेने तहसीलदारांपुढे गोंधळ घातला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सदर महिलेने हा प्रकार मुद्दाम केला की अनावधानाने घडला हे अजून स्पष्ट झाले नाही. झाल्या प्रकाराची कोल्हापूरच्या पंचक्रोशीत मजेदार चर्चा सुरू आहे.
येथील उपसरपंच पूजा शिवगोंडा पाटील यांच्याविरोधात काही ग्रामपंचायत सदस्यांनी गत 6 ऑगस्ट रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यांनी त्यांच्यावर विश्वासात घेऊन काम न करण्याचा आरोप केला होता. या प्रकरणी तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी विशेष सभेची अधिसूचना काढली. त्यानुसार मंगळवारी दुपारी 12 वा. येथे मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. यावेळी ग्रामपंचायतीच्या 10 पैकी एकाही सदस्याने पूजा पाटील यांच्या बाजूने मतदान केले नाही. अविश्वास ठराव 10 विरुद्ध शून्य अशा मतफरकाने मंजूर करण्यात आला. स्वत: पूजा पाटील यांचेही मत त्यांना मिळाले नाही. त्यामुळे तहसीलदारांनी तातडीने त्यांना पदमुक्त करत असल्याचे जाहीर झाले. हा प्रकार लक्षात येताच पूजा पाटील यांना धक्का बसला.
निवडणुकीत आपण मतदान केले, पण ते ही मत आपल्याला मिळाले नाही ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी आणखी जोर देऊन विचार केला असता आपण आपल्यालाच विरोधात मतदान केल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी तहसीलदारांपुढे एकच गोंधळ सुरू केला. त्यांनी तहसीलदारांकडे फेरमतदानाची मागणी केली. पण तहसीलदारांनी त्यांची मागणी स्पष्ट शब्दांत धुडकावून लावली.
SL/ML/SL