मराठा सहकारी बँकेचे कॉसमॉस बँकेत स्वेच्छा विलीनीकरण
मुंबई दि.29(एम एमसी न्यूज नेटवर्क): काही तांत्रिक कारणामुळे अडचणीत सापडलेली मुंबई येथील मराठा सहकारी बँकेच्या सर्व सात शाखा आज पासून रिझर्व बँकेच्या मंजुरीने कॉसमॉस बँकेच्या शाखा म्हणून ग्राहक सेवेत रुजू झाल्या आहेत. कॉसमॉस बँकेच्या सर्व अत्याधुनिक सेवा सुविधा आता या ग्राहकांना मिळणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी दिली.
सी ए काळे यांनी या विलीनीकरणाची सविस्तर माहिती देताना सांगितले की, रिझर्व बँकेच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार 35 एआयडी अंतर्गत रिझर्व बँकेचे निर्बंध असलेल्या अनेक बँकापैकी पहिल्याच बँकेचे हे विलीनीकरण आहे. या विलीनीकरणामुळे ठेवीदारांच्या 84 कोटींच्या ठेवींना संरक्षण मिळाले असून डीआयसीजीसी ने पेमेंट केलेल्या पाच लाख रुपयांखालील ठेवीदारांच्या रुपये 112 कोटींची जबाबदारी बँकेने घेतली आहे.
निगेटिव्ह नेट वर्थ असूनही ठेवीदारांच्या सर्व ठेवींचे संरक्षण करण्याची जबाबदारी कॉसमॉस बँकेने घेतली आहे .ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. कॉसमॉस बँकेने पूर्वाश्रमीच्या मराठा सहकारी बँकेच्या सर्व सेवकांनाही आपल्या सेवेत सामावून घेतले आहे. सहकार क्षेत्रात यानिमित्ताने नवीन पायंडा पडला आहे असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
सीए काळे पुढे म्हणाले की, कॉसमॉस बँक व मराठा सहकारी बँकेच्या या ऐछिक विलीनीकरणामुळे आमच्या बँकेत आत्तापर्यंत एकूण 17 लहान बँका विलीन झाल्या आहेत. लाखो ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण यामुळे झाले आहे. कॉसमॉस बँकेचा आर्थिक पाया भक्कम असून मार्च 2023 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेने रुपये 30.700 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. तसेच बँकेला रुपये 151 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेचे भाग भांडवल व स्वनिधी रुपये दोन हजार कोटींच्या पेक्षा जास्त आहे. तीव्र बँकिंग स्पर्धेमुळे लहान सहकारी बँकांना कामकाज करणे अवघड होऊन बसले आहे. कॉसमॉस बँकेने अशा वेळी सहकाराचे तत्व जपत अनेक बँकांना सहकार्य केले आहे. यामुळे सहकारी बँकात ठेवीदार सुरक्षित असल्याची शाश्वती दिली आहे.
सदर विलीनीकरणामुळे कॉसमॉस बँकेच्या आता मुंबईत एकूण 40 शाखा झाल्या आहेत आणि सात राज्यात एकूण 159 शाखा झाल्या आहेत. पूर्वाश्रमीच्या मराठा सहकारी बँकेच्या खातेदारांनी ठेवीदारांनी आपले बँकिंग व्यवहार पूर्ववत सुरू करावेत असेही आवाहन सीए काळे यांनी सर्व खातेदारांना केले आहे.
पूर्वाश्रमीच्या मराठा सहकारी बँकेच्या अंधेरी पूर्व येथील मुख्य कार्यालयात एका छोटेखानी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, यानिमित्ताने मराठा सहकारी बँकेचे संचालक तसेच कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष प्रवीणकुमार गांधी सर्व संचालक आणि व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे उपस्थित होते.
SW/KA/SL
29 May 2023