वसंत पंचमीच्या मुहूर्तावर झाला विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा

सोलापूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वसंतपंचमी निमित्त पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठलाचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न झाला. ” या पंढरपुरात वाजत गाजत…सोन्याचे बाशिंग लगीन देवाचं लागलं…” अशा गजरात देवाचे लग्न लागले. यावेळी हाजारोच्या संख्येने मंदिरात आणि मंदिराबाहेर भक्तांनी गर्दी केली होती.
अनुराधादीदी शेटे यांची रुक्मिणी स्वयंवर कथा झाल्यावर साधारण सव्वा बाराच्या सुमारास भाविकांना अक्षता वाटप करण्यात आले. आणि त्यानंतर विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची उत्सव मूर्ती समोरासमोर आणून आंतरपाठ धरून शुभमंगल सावधानच्या गजरात विवाह संपन्न झाला.
यावेळी देवाच्या लग्नाच्या आनंदात भाविक हे मोठ्या संख्येने भक्तीगीतांवर नाचताना , फुगड्या खेळताना दिसून आले. एक स्वर्गीय सुखाचा विवाह सोहळा पंढरपुरात भाविकांना अनुभवता आला. यंदा प्रथमच या विवाह सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. वसंत पंचमी पासून आता पुढील एक महिना विठोबास पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात येणार आहे.
Vitthal Rukmini’s marriage ceremony took place on the occasion of Vasant Panchami
ML/KA/PGB
14 Feb 2024