विठ्ठल रखुमाईचा विवाह सोहळा थाटात संपन्न!

 विठ्ठल रखुमाईचा विवाह सोहळा थाटात संपन्न!

सोलापूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये आज वसंत पंचमीचे औचित्य साधून श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा अतिशय भक्तिमय आणि जल्लोषात पार पडला.

‘या पंढरपूरात वाजत गाजत सोन्याचे बाशिंग लगीन देवाचं लागलं…या भक्तिगीतांवर तल्लीन झालेल्या हजारो भाविकांनी अवर्जून हजेरी लावून अक्षता टाकल्या.

श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा वसंत पंचमीला विवाह झाल्याची आख्यायिका आहे. या संदर्भाने श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. त्यामुळे दर वर्षी मंदिरामध्ये श्री विठ्ठल रखुमाईचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विवाह सोहळ्याचे निमित्ताने संपूर्ण मंदिर आज आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. विवाहासाठी श्री रुक्मिणीमातेकडून देवाला पांढरा पोशाख आहेर म्हणून पाठविला जातो तर श्री रुक्मिणीमातेला देवाकडून पैठणी पाठविली जाते.

हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता अक्षता सोहळा पार पडला. लग्न बोहल्यावर देवाच्या प्रातिनिधिक मूर्ती उभ्या केल्या जातात व मध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टका म्हटल्या जातात.

या सोहळ्यानंतर मंदिर समितीच्या वतीने वऱ्हाडींना दिवसभर जेवण ठेवलेले असते. लग्नाचे औचित्य साधून सायंकाळी पाच वाजता शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. आज पासून रंगपंचमी पर्यत देवाला दररोज पांढरा पोशाख केला जाणार आहे आणि या पोशाखावर रोज केशर पाणी आणि गुलाल टाकण्याची परंपरा आहे.

ML/KA/SL

26 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *