नव्या पिढीच्या प्रवाही भाषेचा स्वीकार भाषेच्या विकासासाठी आवश्यक

नवी मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी भाषा विभागाकडून येथील सिडको प्रदर्शन केंद्रात विश्व मराठी साहित्य संमेलनाचे (२७ ते २९ जाने.) आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात काल दुसऱ्या दिवशी ‘मराठीच्या प्रचार आणि प्रसारामध्ये माध्यमांचे योगदान’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात झी २४ तासचे संपादक निलेश खरे, इ-टीव्ही डिजिटलचे सुरेश ठमके यांनी आपले आपले विचार मांडले. दूरदर्शनचे वार्ताहर आणि डिजिटल माध्यमांचे अभ्यासक मिलिंद लिमये यांनी या कार्यक्रमात सूत्रधाराचे काम करून मान्यवरांना बोलते केले.
यावेळी झी २४ तासचे संपादक निलेश खरे म्हणाले, “माध्यमांची संख्या वाढत जाते त्याप्रमाणे भाषेच्या विकासालाही चालना मिळेल. दशकभरापूर्वी पूर्वी माध्यमांमधून केवळ पुणेरी मराठी प्रमाण भाषेचा वापर होत होता. मात्र टप्प्याटप्प्याने ग्रामीण प्रेक्षकांसाठी माध्यमांनी मराठीतील विविध बोलींचाही स्वीकार केला. यामुळे राज्याच्या विविध भागांतील बोलीभाषांचा गोडवा आणि लहेजा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. यामधुन अप्रत्यक्षपणे भाषेच्या विकासाला चालना मिळत आहे.”
कोणतीही भाषा कधीही दुसऱ्या भाषेवर अतिक्रमण करत नाही. तर काळाच्या गरजेनुसार लोकांकडून तिचा स्वीकार केला जातो. जी भाषा दुसऱ्या भाषांतील शब्द स्वीकारते, तिच काळानुरुप विकसित होत जाते. मात्र योग्य शब्द उपलब्ध असतानाही दुसऱ्या भाषेतील शब्द स्वीकारणे हे अयोग्य आहे, असे प्रतिपादनही यावेळी निलेश खरे यांनी केले.
मुद्रीत माध्यम ते डिजिटल माध्यम या प्रवासात भाषेच्या वापरामध्ये झालेल्या बदलांचे मूल्यमापन कसे करता येईल? या प्रश्नाला उत्तर देताना इ-टीव्ही डिजिटलचे सुरेश ठमके म्हणाले, “मुद्रीत माध्यमांमध्ये अजूनही प्रमाणभाषेलाच प्राधान्य दिले जाते. मात्र त्यापुढील डिजिटलचा टप्पा हा प्रवाही आहे. डिजिटल माध्यमांमध्ये की-वर्ड्सला महत्त्व असल्यामुळे अन्य भाषांमधील विशेषतः इंग्रजीमधील शब्द जसेच्या तसे वापराण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. याचा अर्थ आपण मराठीला दूर सारतोय असा नाहीये. तर ज्ञानभाषा, गरजेची भाषा आणि लोकांपर्यंत संवाद साधण्याची भाषा याचा समन्वय डिजिटल माध्यमांमध्ये पहायला मिळत आहे.”
कार्यक्रमाच्या समारोप करताना सूत्रधार मिलिंद लिमये म्हणाले की, आजवर ज्या भाषेची १०० हून अधिक साहित्य आणि नाट्य संमेलनं झाली आहेत. त्या भाषेला कधीच मरण नाही.’मराठी भाषा अजून हजारो वर्षे टिकून राहील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी केंद्राकडून मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
SL/KA/SL
29 Jan. 2023