चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक मध्ये…

नाशिक दि १३– चौथे विश्व मराठी संमेलन 26 , 27 आणि 28 डिसेंबर रोजी नाशिकमध्ये घेण्याचे ठरले असल्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
विश्व मराठी संमेलना बाबत नाशिकच्या साहित्य क्षेत्रातील दिग्गजांबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय घोषित केला .मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या सहकार्याने हे संमेलन घेण्याचे सर्वानुमते मान्य झाले आहे. मराठा विद्या प्रसारक समाज या शिक्षण संस्थेला साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा अनुभव आहे तसेच त्यांच्याकडे मनुष्यबळ , जागा आणि यंत्रणा असल्याने ते संमेलन यशस्वी करू शकतील असा विश्वास वाटत असल्याचे मंत्री म्हणाले.
या संमेलनाचे कार्यालय आणि कामकाजाला 15 ऑगस्ट पासून सुरुवात होईल, नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडूनही संमेलनाला सहकार्य लाभेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे साहित्य संमेलन नव्हे तर मराठी भाषेशी संबंधित कला क्रीडा सह विविध शाखांशी संबंधित संमेलन आहे. आंतरराष्ट्रीय बृहन मराठी मंडळ खानदेशी बोलीभाषा संमेलन यासारख्या विविध संस्था या संमेलनामध्ये सहभागी होतील .साहित्य संमेलनाचा टच या संमेलनाला असणार नाही, तसेच खानदेशी परंपरा संस्कृती जपली जाईल असे त्यांनी सांगितले.
विश्व मराठी संमेलनामध्ये पुणे येथे पुस्तक आदान प्रदान प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद मिळाला. 35000 पुस्तकांची या ठिकाणी अदलाबदल झाली हा प्रकल्प भावी काळातही राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दोन्ही पुरस्काराची रक्कम या संमेलनापासून पाच लाखाहून दहा लाख रुपये करण्यात येणार असल्याचे त्यांनी घोषित केले.