शिक्षण विभागातील गैरव्यवहारांसाठी विशेष तपास पथकाची घोषणा…

मुंबई दि १ — नागपूर मध्ये उघडकीस आलेल्या शालार्थ प्रणालीप्रकरणी उघडकीस आलेल्या घोटाळ्याच्या धर्तीवर राज्यभरात अशा आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ सनदी आणि पोलिस अधिकारी यांचं विशेष तपास पथक नेमून येत्या तीन ते चार महिन्यांत त्याचा अहवाल घेऊन त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली.
याबाबतची लक्षवेधी सूचना प्रवीण दटके यांनी उपस्थित केली होती, त्यावर काशिनाथ दाते, प्रशांत बंब, नरेंद्र भोंडेकर , मुफ्ती इस्माईल आदींनी उपप्रश्न विचारले. नागपूरच्या प्रकरणात अनेक वरिष्ठ अधिकारी सामील असताना त्यांच्यावर कारवाई का नाही, अनेक संस्था चालक आणि अधिकारी अटकपूर्व जामीन मिळवून मोकाट फिरत आहेत असे आरोप सदस्यांनी केले होते.
नागपूर प्रकरणात अद्याप १९ अधिकारी आणि संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, कोणी कितीही मोठा अधिकारी असेल आणि त्यांचा यात सहभाग असेल तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल असं मंत्री म्हणाले. राज्यभरातून अशा प्रकारच्या अनेक तक्रारी येत असून या लक्षवेधीच्या निमित्ताने अनेक सदस्यांनी तक्रारी केल्यावर मंत्री भुसे यांनी विशेष तपास पथकाची घोषणा केली. ML/ML/MS