ठाणे महापालिका क्षेत्रात ८९८४ गणेश मूर्तींचे विसर्जन,
०६ टनाहून अधिक निर्माल्य

ठाणे दि १:–* ठाणे महापालिका क्षेत्रातील पाचव्या दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन रविवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. यावर्षी महापालिका क्षेत्रात पाच दिवसांच्या ८९८४ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी ४८११ मूर्ती शाडू मातीच्या तर, ४१७३ मूर्ती पीओपीच्या होत्या. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला.
त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २५ गणेश मूर्तींचे तसेच, फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील ६२ गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात आणि त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन खाडी घाटांवर करण्यात येत आहे. काही भाविकांनी छोट्या मूर्तीही खाडीत विसर्जन करण्याचा आग्रह धरला. त्यांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी महापालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार विनंती करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर, सातव्या आणि अकराव्या दिवशीही नागरिकांनी सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
कृत्रिम तलाव, फिरते विसर्जन पथक, हौद, स्वीकृती केंद्र येथील सर्व मूर्तींचे विधिवत विसर्जन झाल्यावर पाण्याच्या तळाशी जमणाऱ्या मातीच्या गाळावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या कृती आराखड्यानुसार प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.
०६ टनाहून अधिक निर्माल्य भक्तांनी केले दान

यावर्षी निर्माल्यापासून बायो कंपोस्टिंग पद्धतीने खत करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या खत प्रकल्पात निर्माल्य जमा करण्यात आले. कोलशेत, कौसा, ऋतू पार्क येथे हे बायोकंपोस्टिंग प्रकल्प कार्यान्वित आहेत. पाचव्या दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे ०६ टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. तसेच, निर्माल्यांतील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत.ML/ML/MS