हरियाणाच्या खाप पंचायतीकडून विनेश फोगटला ‘सुवर्ण पदक’ प्रदान

 हरियाणाच्या खाप पंचायतीकडून विनेश फोगटला ‘सुवर्ण पदक’ प्रदान

चंदीगड, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून थोडक्यात वंचित राहीलेली भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटला आज तिच्या जन्मभूमीमध्ये सुवर्णपदकाने गौरवण्यात आले आहे. ऑलिम्पिक व्यवस्थापनानं अंतिम सामन्याच्या काही तास आधी अपात्र ठरवलं होतं. विनेशचं वजन ५० किलो १०० ग्रॅम भरलं होतं. क्रीडा लवादाकडे रौप्यपदक मिळावं अशी मागणी विनेशनं केली होती, पण ती मागणी फेटाळण्यात आली. आज अखेर विनेश फोगटला तिचं वास्तव्य असणाऱ्या हरियाणातील सर्वखाप पंचायतीन रविवारी विनेश फोगटचा सुवर्णपदक देऊन सत्कार केला. विनेशला सुवर्णपदक देण्याची घोषणा खाप पंचायतीनं आधीच केली होती. त्यानुसार तिला रविवारी झालेल्या कार्यक्रमात पदक प्रदान करण्यात आलं आहे.

दरम्यान, यावेळी कार्यक्रमात बोलताना विनेश फोगटनं आपला लढा संपला नसून आत्ता कुठे सुरू झाला आहे, अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “माझा लढा संपलेला नाही, उलट आत्ता कुठे सुरू झाला आहे. आपल्या मुलींच्या सन्मानाची लढाई सुरू झाली आहे. आमच्या आंदोलनावेळीही मी हीच गोष्ट सांगितली होती”, असं विनेश यावेळी म्हणाली. तिला खाप पंचायतीकडून यावेळी मानद सुवर्ण पदक प्रदान करण्यात आलं.

“मी जेव्हा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात खेळू शकले नाही, तेव्हा मला वाटलं की मी खूप दुर्दैवी आहे. पण भारतात परत आल्यानंतर ज्या प्रकारे माझं स्वागत झालं, मला लोकांचं प्रेम आणि पाठिंबा मिळाला, ते पाहता मला वाटतंय की मी खूप सुदैवी आहे. अशा पाठिंब्यामुळे इतर महिला खेळाडूंचाही आत्मविश्वास वाढेल की त्यांचा समाज कठीण काळातही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे”, असं विनेश फोगटनं यावेळी नमूद केलं. “मला आत्ता मिळणाऱ्या या सन्मानासाठी मी कायम ऋणी राहीन. हा सन्मान इतर कोणत्याही पदकापेक्षा खूप मोठा आहे”, असंही विनेशनं यावेळी म्हटलं.

भारतात परतल्यानंतर विनेश फोगटचं जंगी स्वागत करण्यात आलं. हरियाणातील तिचं गाव बलालीपर्यंत विनेशची जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खाप पंचायतीचे सदस्य व विनेशचे चाहते मिरवणुकीत उपस्थित होते. त्यावेळी मिळालेला सन्मान हा १००० पदकांपेक्षाही जास्त महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया विनेशनं माध्यमांना दिली होती.

SL/ML/SL

26 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *