शिक्षणसंस्था संचालक
डॉ. विनय पी. राऊत यांना ‘एज्युकेशन आयकॉन अवॉर्ड २०२६’ प्रदान
मुंबई, दि २७ :
शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनय पी. राऊत यांना डॉ. दिलीप पाटील यांच्या ‘छत्रपती हायर एज्युकेशन इंटेलेक्चुअल फोरम’ (CHEIF), महाराष्ट्रतर्फे प्रतिष्ठेचा ‘एज्युकेशन आयकॉन अवॉर्ड २०२६’ शिवाजी मंदिर, दादर येथे नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
हा पुरस्कार एका विशेष सोहळ्यात माजी खासदार व श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट), मुंबईचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
राज्यशास्त्र विभागातील माजी प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून डॉ. राऊत यांची शैक्षणिक कारकीर्द अत्यंत यशस्वी राहिली असून, त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला आहे. विद्या विकास एज्युकेशन सोसायटीअंतर्गत कार्यरत १८ शैक्षणिक विभागांचे त्यांनी दूरदर्शी व प्रभावी व्यवस्थापन केले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहेत.
डॉ. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयटी, बायोटेक, कला, वाणिज्य, दूरस्थ शिक्षण, रोबोटिक्स, संगीत व क्रीडा या क्षेत्रांतील कौशल्याधारित व भविष्याभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांना करिअरसाठी सक्षम बनविणे, यावर त्यांचा विशेष भर आहे.
मुंबईपुरते कार्य मर्यादित न ठेवता त्यांनी ग्रामीण व आदिवासी भागातही शिक्षणाचा प्रसार केला आहे. ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथे हजारो आदिवासी विद्यार्थ्यांसाठी बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथे इंग्रजी माध्यमाची शाळा स्थापन करून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दारे खुली केली आहेत.
शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे संस्थेतील अनेक मुख्याध्यापक व शिक्षकांना जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालील तीन शाळांना २०२५ मध्ये ‘मुख्यमंत्री – माझी शाळा, सुंदर शाळा’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
शिक्षण प्रसार व सामाजिक उत्थानासाठी समर्पित असलेले डॉ. विनय पी. राऊत यांचे कार्य हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांना प्रदान करण्यात आलेला ‘एज्युकेशन आयकॉन अवॉर्ड २०२६’ हा त्यांच्या निस्वार्थी सेवेचा व समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा यथोचित गौरव मानला जात आहे.JS/ML/MS