गाव जल- स्वयंंपूर्ण करणाऱ्या हनुमंत केंद्रेंचा चित्रपट OTT वर

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गावाला जल स्वावलंबी करणाऱ्या नांदेडमधल्या नागदेरवाडी गावातील हनुमंत केंद्रे यांची वास्तव कथा असलेला ‘पाणी’ हा आदिनाथ कोठारे दिग्दर्शीत चित्रपट आता OTT वर दाखल झाला आहे. प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये फार चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता; आता ओटीटीवर तो प्रेक्षकांना आकर्षित करतो की नाही, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ही बातमी चाहत्यांना दिली आहे. आदिनाथ कोठारे दिग्दर्शित पहिला चित्रपट ‘पाणी’ आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.
प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीज पोस्ट केल्या आहेत. त्यात पाणी चित्रपटाचे पोस्टर पाहायला मिळते. हा चित्रपट आता प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, असं त्यात लिहिलं आहे.
नितीन दीक्षित यांनी लिहिलेल्या ‘पाणी’मध्ये अदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी आणि विकास पांडुरंग पाटील यांनी काम केलं होतं. नेहा बडजात्या आणि दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनास आणि डॉ. मधु चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर महेश कोठारे आणि सिद्धार्थ चोप्रा या प्रकल्पाचे सहयोगी निर्माते आहेत. १८ ऑक्टोबर रोजी ‘पाणी’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.
SL/ML/SL
9 Dec. 2024