प्रेमवीरांचे गाव- पाच हजार लोकसंख्येत ४०० प्रेमविवाह

 प्रेमवीरांचे गाव- पाच हजार लोकसंख्येत ४०० प्रेमविवाह

करंजी,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क)  :  आज व्हॅलेंटाईन डे जगभरातील प्रेमवीरांसाठी प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या देशातही सुरुवातीला काही वर्ष झालेल्या विरोधानंतर या दिवसाला आता आपलेसे करण्यात आले आहे. देशभरातील तरुणाई मोठ्या जल्लोशात व्हॅलेटाईन डे साजरा करते. यानिमित्ताने आपण महाराष्ट्रातील एका प्रेमवीरांच्या अनोख्या गावाबाबत जाणून घेऊया. या गावच्या अवघ्या पाच हजाराच्या लोकसंख्येत ४०० हून अधिक जणांनी प्रेमविवाह केले आहेत. आणि ते देखील जातीपातीच्या मर्यादा ओलांडून.

कुठे आहे हे अनोखे गाव

तर असे हे अनोखे प्रेमवीरांचे गाव म्हणजे करंजी गाव. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील गौंड पिंपरी तालुक्यातील या  गावात मागील चार दशकांपासून प्रेमविवाहांची ही परंपरा अगदी विना वाद सुरू आहे. करंजी हे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे गाव. वडेट्टीवारांसह  ४०० हून अधिक संसार येथे प्रेमविवाहातून फुलले आहेत. वैशिष्ट्य म्हणजे या प्रेमनगरीत १२हून अधिक जातीतील युवकांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. करंजी गावात ११ सदस्यीय ग्रामपंचायतीतही ग्रामस्थांनी सहा प्रेमीयुगलांची बिनविरोध निवड करत प्रेमाचा संदेश दिला आहे. अशा युगुलांतून एकाची सरपंच, उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे.

करंजी गावात जाती-जमातींचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. शेती हाच मुख्य व्यवसाय असून काहीजण शेतमजुरी करतात. सर्व गुण्यागोविंदाने राहतात. परस्परांवर असलेल्या विश्वासापोटी गावात जातीअंतर्गत आणि आंतरजातीय प्रेम विवाह होत आहेत. पालकही कन्यादानासाठी पुढाकार घेतात, असे सरपंच सरिता नागेश पेटकर यांनी सांगितले.

चाळीस वर्षांपासून होत आहेत प्रेमविवाह

१९८० पासून गावात प्रेमविवाहाला सुरुवात झाली. ही आता प्रथाच झाली. या काळात असे चारशे विवाह झाले आहेत. यात प्रारंभी आंरजातीय विवाहांना विरोध होत होता. पंरतु, आता कुणीच विरोध करत नाही. अनैतिक मार्गाचा अवलंब करू नका, असा कडक इशारा मात्र प्रेमी युगुलास आवर्जून दिला जातो. विशेष म्हणजे या चार दशकांत घरगुती हिंसाचाराचा एकही गुन्हा पोलिसांत दाखल नाही.

 

 

SL/KA/SL

14 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *