विकसित भारत संकल्प यात्रा

ठाणे,दि.१६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोहोचावेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली असून ही यात्रा १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी, २०२४ या कालावधीत राज्यभरात पार पडणार आहे.
या मोहिमेच्या तयारीच्या अनुषंगाने नीती आयोगाच्या संचालक जागृती सिंगला यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात विविध शासकीय विभागांची आढावा बैठक झाली.
या बैठकीस जिल्हा परिषद, महानगरपालिकांचे अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मार्गदर्शन करताना जागृती सिंगला यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही मोहीम देशभरात राबविली जाणार आहे.
प्रत्येक गरजू भारतीय लाभार्थ्याचा शोध घेवून त्या लाभार्थ्यापर्यंत शासकीय योजनांची माहिती तसेच प्रत्यक्ष लाभ पोहोचणे गरजेचे आहे. या मोहिमेद्वारे प्रत्येक नागरिकाचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी सर्व स्तरांवरुन प्रयत्न केले जाणार आहेत. यातूनच शासन आणि लाभार्थींमधील सुसंवाद आणखी दृढ होईल.
यासाठी प्रत्येक शासकीय विभागाच्या अधिकारी-
कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत झोकून देवून उत्साहाने काम करणे, अपेक्षित आहे.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले की, “विकसित भारत संकल्प यात्रा” नावाची देशव्यापी मोहीम ग्राम/शहरी/नगरपालिका स्तरावर राबविण्यात येणार आहे. भारत सरकारच्या एकूण ३४ फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी सर्व स्तरांवरुन प्रयत्न केले जाणार आहेत. या मोहिमेत काम करताना सर्व विभागांनी दर्जा आणि संख्या या दोन बाबींवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
ML/KA/SL
16 Nov. 2023