विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च आणि सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर झालेल्या सुनावणीनंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने अजमल कसाबचे फाशीच्या शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळताना कसाब ने आपणच हेमंत करकरे यांच्यासह तीन पोलीस अधिकाऱ्यांना ठार केल्याच्या कबुलीजबाबाचा विशेष उल्लेखही केला होता. असे असतानाही ” हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाब ची नव्हती, ही गोष्ट दडपणारे उज्जवल निकम हे देशद्रोही आहेत, ”असे विधान केल्याबद्दल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कायदा विभागाचे सहसंयोजक ॲड. शहाजी शिंदे यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल नोटीस पाठवली आहे.
सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार अर्जुन गुप्ता यांच्या वतीने ॲड. शिंदे यांनी वडेट्टीवार यांना ही नोटीस बजावली आहे. या
नोटिशीत ॲड.शहाजी शिंदे यांनी म्हटले आहे की, मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात 11 दहशतवाद्यांचा सहभाग होता.त्यापैकी एकाला म्हणजे अजमल कसाब ला जिवंत पकडण्यात यश मिळाले. कसाब याच्यावर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून न्यायालयात खटला दाखल केला गेला. सत्र न्यायालयात न्या. तहलियानी यांनी उपलब्ध पुराव्यांचा विचार करून कसाब ला फाशीची शिक्षा सुनावली. याविरुद्ध कसाबने उच्च न्यायालयात अपील केले होते. ते अपील फेटाळून उच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.
कसाबतर्फे सर्वोच्च न्यायालयात या शिक्षेला आव्हान दिले गेले. सर्वोच्च न्यायालयाने कसाबचे अपील फेटाळून त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली. सर्वोच्च न्यायालयाने कसाबचे अपील फेटाळताना कसाबने आपण हेमंत करकरे यांच्यासह तीन पोलीस अधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार केल्याबाबत दिलेल्या कबुलीजबाबाचा निकालपत्रात विशेष उल्लेख केला आहे. असे असतानाही वडेट्टीवार यांनी करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीमुळे झाला नाही असे विधान जाहीररीत्या करून न्यायालयाचा अवमान केला आहे. आपल्या विधानांमुळे न्यायालयाचा अवमान कायदा 1971 नुसार आपल्यावर फौजदारी कारवाई करण्यास आपण पात्र ठरला आहात. या नोटिशीला 15 दिवसांत उत्तर न दिल्यास आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरु करण्यात येईल, असेही ॲड. शहाजी शिंदे यांनी नोटिशीमध्ये नमूद केले आहे. वडेट्टीवार यांच्या कार्यालयात ही नोटीस पाठविण्यात आली असून ई मेल द्वारेही नोटीस पाठविली गेल्याचे ॲड. शिंदे यांनी सांगितले.
ML/ML/PGB 7 May 2024