विधिमंडळाचे अधिवेशन संस्थागित , नागपुरात पुढील अधिवेशन

मुंबई दि ९– विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेचं कामकाज आज संस्थगित करण्यात आलं. पुढील अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात घेण्याची शिफारस राज्यपालांना केली जाईल अशी माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.
त्यापूर्वी राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव सभागृहामध्ये आज मांडण्यात आला.
ऑक्टोबरमध्ये राज्यपालांनी मंजुरी दिलेले एकूण १४ अध्यादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आज सभागृहात सादर केले. यात ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कालावधी संपलेल्या राज्यातील, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती आणि उप सभापती यांच्या निवडणुका नव्वद दिवसांच्या कालावधीसाठी तात्पुरत्या पुढे ढकलण्याचा अध्यादेशाचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीमुळे पोलीस आणि प्रशासनावर अवाजवी ताण पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अप्रत्यक्षपणे निवडलेल्या नगरपंचायतीच्या अध्यक्षाचा आणि उपाध्यक्षाचा पदावधी पाच वर्षे करण्याचा अध्यादेशही आज सभागृहात मांडण्यात आला. उद्योगपती
रतन नवल टाटा यांच्यासह माजी मंत्री मधुकर पिचड, माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य रोहिदास पाटील, बाबा सिद्दीकी, वसंतराव चव्हाण तसंच ज्ञानेश्वर पाटील, निवृत्ती उगले, रामकृष्ण पाटील, उल्हास काळोखे, अर्जुनसिंग वळवी, हरीराम वरखडे, सिताराम दळवी, विजय ऊर्फ आप्पा साळवी आणि हरिश्चंद्र चव्हाण या माजी विधानसभा सदस्यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव मंजूर करत सभागृहानं श्रद्धांजली अर्पण केली.