विधानसभेत सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा नियमित सत्रातील प्रश्नोत्तराच्या तासात आज मंत्री , सत्तारूढ सदस्य आणि विरोधक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली .
दोन्ही बाजूने एकमेकांना उद्देशून आव्हानात्मक भाषा वापरण्यात आली आणि आरोप प्रत्यारोप ही करण्यात आले. मूळ प्रश्न संजय सावकारे यांनी उपस्थित केला होता, राज्यातील सर्व शाळांत विजेचा प्रश्न असल्याने सौर ऊर्जा वापरण्यावर भर दिला जाईल असं ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.
यानंतर अंगणवाडी सेविका आंदोलन करीत असल्याचा मुद्दा प्रकाश आबिटकर यांनी मांडला त्यावर मंत्र्यांनी त्यांचे मानधन नुकतेच २५ टक्के वाढवले आहे असं सांगितलं. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी मंत्री दिशाभूल करीत आहेत असं म्हणताच आधी मंत्री आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आणि मग दोन्ही बाजूच्या सदस्यांनी एकमेकावर तोंडसुख घेतले, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करून पुढील प्रश्न पुकारला.
बोगस डॉक्टर साठी मोहीम
राज्यातील बोगस डॉक्टर शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल आणि ही मोहीम सातत्याने राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांना दिल्या जातील अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
याबाबतचा प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला होता त्यावर वर्षा गायकवाड, योगेश सागर, रवींद्र वायकर, अजय चौधरी आदींनी उप प्रश्न विचारले.
पदे भरती लवकरच
राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयात असणारी वर्ग तीनची ५६०० पदे डिसेंबर अखेरपर्यंत तर वर्ग एक आणि दोन ची पदे येत्या एप्रिल पर्यंत भरण्यात येतील अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. याबाबतचा प्रश्न सुभाष थोटे यांनी विचारला होता. त्यावर राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख यांनी उप प्रश्न विचारले होते.
ML/KA/PGB 20 Dec 2023