विधानपरिषदेच्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे

नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी अखेर भाजपाच्या प्रा. राम शिंदे यांची निवड होणार हे आता निश्चित झाले आहे. आज दुपारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत केवळ राम शिंदे यांचाच एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार आहे.
विधान परिषदेचे सभापती पद शिवसेनेच्या साठी मिळावे यासाठी एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रयत्न केले होते. सध्या उपसभापती पदी असणाऱ्या डॉ. नीलम गोऱ्हे यांना या पदावर बसविण्याचा त्यांचा विचार होता. यानिमित्ताने पहिली महिला सभापती महाराष्ट्र राज्याला मिळाली असती असा त्यांचा दावा होता. मात्र भाजपाने हा त्यांचा दावा फेटाळून लावत हे पद आपल्याकडेच असले पाहिजे असे ठरवल्याने अखेर भाजपाच्या उमेदवारानेच आज अर्ज दाखल केला.
प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी देण्यासाठी आज भाजपाची बैठक झाली आणि त्यात शिंदे यांचे नाव निश्चित करण्यात आले. शिंदे हे कर्जत जामखेड या अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी असून या आधीच्या भाजपा युतीच्या सरकारमध्ये ते गृह खात्याचे राज्यमंत्री आणि त्यानंतर जलसंधारण खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. 2019 आणि 2024 या दोन्ही निवडणुकांमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पवार यांच्याकडून पराभूत झाले होते. त्यानंतर भाजपाने त्यांना विधान परिषदेवरती नियुक्त करून त्यांचे पुनर्वसन केले आहे. आता महाराष्ट्र विधान परिषदेवर सभापती म्हणून त्यांची नियुक्ती करून भाजपाने धनगर समाजाला न्याय दिल्याचे बोलले जाते.
ML/ML/PGB
18 Dec 2024