महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाचे एनडीए चे उमेदवार….

नवी दिल्ली दि १७ — महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा एनडीए आघाडीचे देशाच्या उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून आज करण्यात आली आहे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आज झालेल्या पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली.
२० ऑक्टोबर १९५७ साली तमिळनाडू मध्ये ओबीसी समाजात जन्माला आलेल्या राधाकृष्णन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून त्यांनी तमिळनाडू प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आहे, त्यापूर्वी ते भारतीय जनसंघाचे पदाधिकारी होते. ते दोन वेळा तमिळनाडूमधील कोइंबतूर मधून खासदार म्हणून निवडून आले होते. महाराष्ट्राचे राज्यपाल होण्यापूर्वी ते तेलंगणाचे आणि झारखंडचे राज्यपाल होते.
उपराष्ट्रपती पदासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य मतदान करतात , निवडून येण्यासाठी ३९२ मतांची आवश्यकता आहे, एन डी ए कडे दोन्ही सभागृहातील ४२७ सदस्यांचे समर्थन आहे तर विरोधकांकडे केवळ ३५५ सदस्यांचे समर्थन आहे. यामुळे राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदावर निवडून येण्याची केवळ औपचारिकता शिल्लक आहे असे मानले जाते. येत्या काही दिवसांत तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुका होणे अपेक्षित असून भाजपने त्यादृष्टीने ही राजकीय खेळी केल्याची देखील चर्चा आहे. ML/ML/MS