ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन
पुणे,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ समीक्षक, लेखक आणि मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले (७४)यांचे आज येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
कथा, दीर्घकथा, कविता, कादंबरी, ललीत गद्य, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी मौल्यवान साहित्यनिर्मिती केली आहे. सामाजिक भान असलेले लेखक ओळखल्या जाणाऱ्या कोत्तापल्ले यांनी 2013 मध्ये चिपळूण येथे झालेल्या 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. २००५ ते २०१० या कालावधीत ते मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते. कोतापल्ले हे राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्षही होते.
‘शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधनिबंध सादक करून त्यांनी 1980 मध्ये पीएचडी मिळवली.
‘ज्योतीपर्व’ हा महात्मा फुले यांच्या जीवनावरील कोत्तापले यांनी लिहिलेला ग्रंथ विशेष उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर राजधानी’, ‘वारसा’, ‘सावित्रीचा निर्णय’ या त्यांच्या दीर्घकथा लोकप्रिय आहेत. ‘गांधारीचे डोळे’, ‘मध्यरात्र’, ‘पराभव’ या त्यांनी लिहिलेल्या वेगळ्या धाटणीच्या कादंबऱ्या मनाचा ठाव घेतात. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आणि भाषा विषयक काम करणाऱ्या जवळपास सर्वच संस्थांसाठी काम करून त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.
कॉपीमुक्ती अभियान यशस्वी करणारे ते एकमेव कुलगुरू ठरले. कॉपीमुक्तीसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र फार प्रभावी ठरले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्त कॉपीमुक्ती स्वीकारली. विद्यार्थी संघटना व विद्यापीठ प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण करण्यात डॉ. कोत्तापल्ले यांना यश आले. कमवा आणि शिका योजनेंतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मानधन वाढवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर समर्पक तोडगा काढणारे विद्यार्थीभिमूख प्राध्यापक आणि कुलगुरू कोत्तापल्ले यांना ओळखले जात असे.
Veteran writer Nagnath Kottapalle passed away
SL/KA/SL
30 Nov. 2022